Pune Tendernama
पुणे

Pune : महापालिकेचे फटाके गाळ्यांच्या लिलावात यंदा 43 लाखांचे नुकसान

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने शनिवार पेठेतील वर्कर बाग येथे फटाके गाळ्याच्या जागेसाठी केलेल्या लिलावात गेल्यावर्षीच्या तुलनेत महापालिकेचे यंदा ४३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांमध्ये रिंग झाल्याने गेल्यावर्षी ज्या स्टॉलसाठी दीड ते पावणेदोन लाख भाडे मिळाले होते, तिथे यंदा केवळ ३७ हजार ते ६१ हजार रुपयांपर्यंत भाडे मिळाले आहे. महापालिकेने ऑनलाइन लिलाव करूनही यंदा फारसा फायदा झालेला नाही.

महापालिकेतर्फे दिवाळीमध्ये फटाके विक्रीसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा व्यवसायिकांना भाड्याने दिल्या जातात. यापूर्वी ऑफलाइन लिलाव केला जात असल्याने ठरावीक व्यावसायिकांनाच तेथे संधी मिळत होती. शनिवार पेठेतील वर्तक बागेतील ३५ गाळ्यांचा लिलाव करताना कसबा विधानसभा मतदारसंघातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केली. त्यामुळे अनेकांना बोली न लावताच स्पर्धेतून बाहेर जावे लागले.

कर्मचाऱ्यांनाही दिल्या धमक्या

या लिलावामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या. येथे योग्य स्पर्धा न झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांनी व संबंधित व्यावसायिकांनी अवघ्या २५ हजारांत स्टॉल घेतले. काहींनी तेथे पोटभाडेकरू ठेवून त्यांच्याकडून जास्त पैसे उकळले होते. त्यामुळे महापालिकेने पुढाऱ्यांचा विरोध झुगारून २०२३ पासून फटाके विक्रीच्या गाळ्यांसाठी ऑनलाइन बोली लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेला वर्तक बाग येथील ३५ गाळ्यांमधून ६२ लाख ९० हजार ८७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

नेमके काय झाले?

* ऑनलाइन लिलाव करताना एका गाळ्यासाठीची बोली दीड ते पावणेदोन लाखापर्यंत गेली होती

* यंदा महापालिकेने वर्तक बागेत ४० गाळ्यांसाठी ऑनलाइन लिलाव करण्याचा निर्णय घेतला

* त्यासाठी प्रत्येक गाळ्यासाठी २८ हजार ७०० रुपये रक्कम निश्‍चित केली

* यासाठी ४३ व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये अनामत रक्कम भरून ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याची तयारी दर्शविली होती

* ऑनलाइन बोली करताना व्यापाऱ्यांनी संगनमत करून लिलावाची खुली स्पर्धा होऊ दिली नाही

* सर्वांनी बोलीचे ऑनलाइन अर्ज एकाच ‘आयपी ॲड्रेस’वरून भरल्याचे निदर्शनास

* त्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ही निविदा रद्द करून फेर निविदा काढण्याचा निर्णय घेतला

* फेरनिविदा काढताना गेल्यावर्षी प्रमाणे जास्त उत्पन्न मिळेल अशी महापालिकेला अपेक्षा होती

* पण यामध्ये व्यापाऱ्यांनी पूर्वीच्या रकमेपेक्षा थोडी रक्कम जास्त भरून गाळे मिळवले

* या गाळ्यांसाठी ३७ हजार २२५ रुपये ते ६८ हजार २४० रुपये दरम्यान भाडे मिळाले

* एकूण उत्पन्न १९ लाख ९० हजार ११५ रुपये इतके

वर्तक बाग येथील फटाका गाळ्यांच्या लिलावात संगनमतही झाल्याचे दिसून आल्याने फेरलिलाव करण्यात आले. त्यातही गेल्यावर्षीपेक्षा कमी बोली लावण्यात आल्याने उत्पन्न कमी मिळाले आहे. पुढच्या वर्षी यात आणखी सुधारणा करून जास्त उत्पन्न मिळेल, खुली स्पर्धा होईल याची काळजी घेतली जाईल.

* मुकुंद लेले, सहाय्यक आयुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

वर्ष आणि उत्पन्न

२०२२ - १४, ५७, ३००

२०२३ - ६२, ९०, ८७२

२०२४ - १९,९०, ११५