PMC Tendernama
पुणे

Pune : गोंधळ टाळण्यासाठी काढले दोन टेंडर पण नशिबी एकच ठेकेदार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेश विसर्जनासाठी फिरत्या हौदांचे नियोजन करताना त्यातील गोंधळ टाळण्यासाठी व समन्वयासाठी दोन स्वतंत्र टेंडर काढण्यात आले. पण या दोन्ही टेंडरचे काम एकाच ठेकेदाराला मिळाले आहे. त्यामुळे १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १५० गाड्यांचे नियोजन कसे होणार याबाबत प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान दुसऱ्या ठेकेदाराने कामाची तयारी दर्शविल्यास त्या संस्थेस काम देऊ, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

कोरोना काळापासून महापालिकेने फिरत्या हौदांद्वारे गणेश विसर्जनाची व्यवस्था सुरू केली. या कामातील त्रुटींमुळे यंदापासून फिरत्या हौदांचे टेंडर काढणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. पण महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत फिरत्या हौदांची मागणी केल्याने तातडीने घनकचरा विभागाने अल्पमुदतीचे टेंडर काढले. आयुक्तांनी या निर्णयाचे समर्थन करत टेंडर आवश्‍यक असल्याचे सांगितले.

या टेंडर प्रक्रियेत पाच ठेकेदारांनी टेंडर भरले. कागदपत्रांच्या छाननीमध्ये सिद्धी ॲडव्हर्टायझिंग आणि स्वयंभू ट्रान्स्पोर्ट हे ठेकेदार पात्र ठरले. स्वयंभू ट्रान्सपोर्टने सर्वात कमी खर्चाचे टेंडर भरल्याने त्यास दोन्ही टेंडरचे काम मिळाले असून, त्याच्या अंतिम मान्यतेचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. परिमंडळ एक, तीन आणि चार यासाठी ८५.८६ लाखांचे टेंडर आहे. तर दुसरे टेंडर परिमंडळ दोन आणि पाचसाठी असून, त्यासाठी ५७.२४ लाखाचा खर्च आहे. परिमंडळ दोन आणि पाच मध्ये मध्यवर्ती पेठांचा भाग असल्याने त्यांची स्वतंत्र टेंडर आहे.

‘‘फिरत्या हौदांचे व्यवस्थित नियोजन व्हावे, यासाठी दोन टेंडर काढल्या होते. पण आता दोन्ही टेंडरसाठी एकच ठेकेदार पात्र ठरला आहे. प्रशासनाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र ठेकेदार असणे योग्य आहे. त्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराने स्वयंभूच्या दरात काम करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना काम देता येईल. ठरलेल्या नियमानुसार ठेकेदारास सेवा पुरविणे बंधनकारक आहे.’’

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

या गोष्टी करणे बंधनकारक

- ठेकेदाराने १५० गाड्यांचे फिटनेस सर्टिफिकेट, इंशुरन्स यासह इतर गोष्टींची पूर्तता करणे आवश्‍यक

- फिरत्या हौदाच्या गाडीचा क्रमांक, चालक यांची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक

- फिरत्या हौदाची सजावट करणे, महापालिकेचे नाव ठळकपणे लिहिणे

- निःशुल्क विसर्जन करून घेणे

- एकाच ठिकाणी उभे न राहता गाडी फिरवत ठेवणे आवश्‍यक

- फिरत्या हौदांसाठी कचरा वाहतुकीच्या गाड्या वापरू नये