Mula River

 

Tendernama

पुणे

मुळा-मुठा नदीकाठचा होणार कायापालट; 650 कोटींचे निघाले टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नदीकाठ सुधार योजनेसाठी शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय ते बंडगार्डन पाठापोठ पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान सात किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणेसाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचे दुसरे टेंडर काढले आहे. मात्र, हे काम पीपीपी (खासगी भागीदारी) तत्त्वावर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटर नदीकाठ सुधारणेचा काम हाती घेण्यात आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत महापालिका पुणे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या दोन्ही काठांचा विकास करणार आहे. सुमारे ४४ किलोमीटर नदी काठावर पिचिंग करून नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नदी काठावर ठिकठिकाणी उद्याने, छोटी मैदाने, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, विरंगुळा केंद्र करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण ही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यासाठी टप्प्याटप्प्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअगोदर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ते बंडगार्डन या दरम्यान पाच किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुशोभीकरणाची ३६२ कोटी रुपयांच्या खर्चाचे टेंडर महापालिकेकडून काढण्यात आले आहे. या टेंडरची मुदत २२ डिसेंबरला संपत आहे. दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा या भागासाठी ६५० कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरसाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पीपीपी तत्त्वावर हे काम करून घेण्यात येणार असून त्या मोबदल्यात बॉण्डचा वापर करण्यात येणार आहे.

काही ठिकाणी नदीतील गाळ काढून नदी प्रवाही करण्यात येईल. तसेच संगम पूल ते बंडगार्डन पुला दरम्यान बोटिंगची सुविधाही करण्यात येणार आहे. ही कामे करत असताना पूररेषा, आणि पर्यावरणाचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच पर्यावरण संबंधित सर्वच विभागाच्या परवानग्या घेऊनच हा प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४७०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. बंडगार्डन ते मुंढवा १ जानेवारीला प्रिबीड मिटिंग होणार असून ७ फेब्रुवारीला टेंडर उघडण्यात येणार आहे, अशी माहितीही आयुक्त कुमार यांनी दिली.

महापालिकेच्या हद्दीमध्ये चौतीस गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वाढलेल्या हद्दीनुसार खडकवासला ते मांजरी गावापर्यंत हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महापालिकेला ५० किलोमीटर लांबीची नदीकाठ सुधार प्रकल्प करावा लागणार आहे. वाढलेल्या हद्दीसाठी आराखडा तयार करून टेंडर काढणार आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

‘निधीसाठी पर्यायांचा विचार’

या योजनेच्या पहिल्या टप्यासाठी ३५० कोटींचा खर्च महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यानचा खर्च हा पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहे. यासाठी काम मिळणाऱ्या कंपनीला बॉण्ड देण्यात येतील. या योजनेसाठी निधी उभा करण्यासाठी विविध संस्थांचा विचार करण्यात येत आहे. यामध्ये वर्ल्ड बँक, एशियन बँक असे पर्याय आहेत. त्याचबरोबर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एसपीव्ही मार्फत याचे संचलन होणार आहे. जायका आणि नदीकाठ सुधार प्रकल्प पुढील तीन वर्षांमध्ये पूर्ण होतील असा विश्‍वासही आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला.

जायका प्रकल्पासाठी टेंडर भरलेल्या परंतु कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे बाद झालेल्या कंपन्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या सात दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता केली, तर त्यांची टेंडर ग्राह्य धरून ती मान्यतेसाठी जायकाला पाठविण्यात येणार आहे. टेंडर प्रक्रियेत पुरेशी स्पर्धा होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने जायका प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आल्या आहेत. सहा कंपन्यांनी या निविदा भरल्या आहेत. त्यापैकी पाच कंपन्या या तांत्रिक छाननीत पात्र ठरलेल्या नाहीत. तर एकच कंपनी पात्र ठरली आहे. दरम्यान या संदर्भात काल महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिल्ली येथे जाऊन जलशक्ती मंत्रालय आणि जायकाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

या संदर्भात आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, ‘‘जायका प्रकल्पासाठी टेंडर भरलेल्या परंतु कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपात्र ठरलेल्या कंपन्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे त्यांना सात दिवसांची संधी देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यात आली, तर सर्व माहिती जायकाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.’’

टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama

टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama

टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama