पुणे (Pune) : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यामधून ज्यावर प्रक्रिया होऊ शकत नाही अशा नाकारलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथे प्रतिदिन ३०० टन क्षमतेचा सायंटिफिक लँडफिल (एलएलफ) प्रकल्प सुरू करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १८ कोटी ४३ लाख रुपयांच्या टेंडरला मान्यता देण्यात आली आहे.
शहरात रोज सुमारे २२०० टन कचऱ्याची निर्मिती होते. त्यापैकी १० ते १५ टक्के ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करत येत नाही अशा नाकारलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते. सध्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तर उरुळी देवाची येथील प्रकल्पाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यानंतर प्रशासनाने वेगाने पाऊल उचलत हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यास सोमवारी (ता. ३०) मान्यता देण्यात आली.
प्रकल्पात काय होणार?
- उरुळी देवाची येथील चार एकर जागेत हा सायंटिफिक लँडफिलि प्रकल्प उभारला जाणार
- त्यात प्लास्टिक, चिंध्या, चमचे, प्लास्टिकच्या तुटलेल्या प्लेटचे तुकडे, दगड, खरी, विटा यासह अन्य कचऱ्याचा समावेश
- हा कचरा शास्त्रीय पद्धतीने जिरवला जाईल
- त्यातून निघणारे घाण पाणी सांडपाणी वाहिन्यातून प्रकल्पात नेऊन शुद्ध केले जाणार
टेंडर प्रक्रियेबाबत...
या प्रकल्पासाठी राबविलेल्या टेंडरसाठी महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा २१ टक्के कमी दराने १८ कोटी ४३ लाखांचे टेंडर भरले होते. त्यास सोमवारी स्थायी समितीने मान्यता दिली. १२ महिने कालावधीसाठी देखभाल दुरुस्त करणे या कामासाठी आदर्श एनव्हायरो प्रा.लि. यांची १८ कोटी ४३ लाख रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ठेकेदाराला हा प्रकल्प सहा महिन्यांत उभारावा लागणार असून १२ महिने प्रकल्प चालवावा लागणार आहे.