Pune

 

Tendernama

पुणे

पुणे महापालिका स्वत:ची पाठ थोपटण्यासाठी करणार ३० लाख खर्च

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोरोना काळात अनेक कुटुंब उद्‌ध्वस्त झाली, घरातील प्रमुख व्यक्ती गमविण्यासह आर्थिक संकटही ओढवले. त्यातून हे कुटुंब सावरलेले नाहीत. मात्र, पुणे महापालिकेने या काळात केलेल्या कामासाठी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी तब्बल ३० लाख रुपये खर्च करून कॉफिटेबल बुक तयार करण्याचा खटाटोप सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुस्तकासाठी ठेकेदारांकडून (Contractor) प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविताना महापालिकेच्या नाकीनऊ आले होते. या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात खर्च आहे, अनेक उपकरणे, वस्तू महागड्या दराने खरेदी केल्या आहेत. या सर्व खर्चाचा तपशील असणारा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या मुख्यसभेने सुमारे चार महिन्यांपूर्वी दिले होते. त्यावर एक खाससभा घेऊन चर्चा देखील केली जाणार होती. मात्र, याचा विसर पडलेला असताना आता प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून कॉफिटेबल बुकसाठी ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

पुस्तकाच्या टेंडरसाठी अटी व शर्ती

१. प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडेच पुस्तकाचे काम

२. संस्थेने किमान २० लाख रुपयांचे काम केलेले असावे

३. संबंधितांना संशोधन पुस्तकांचा अनुभव असावा.

४. टेंडरधारक संस्था पुण्यातील असली पाहिजे

कोरोनाच्या काळात महापालिकेने विविध प्रकारची कामे केली आहेत. या कामाचा आढावा घेणारे पुस्तक तयार केले जाणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे अभिप्राय असणार आहेत. हे पुस्तक तयार करण्यासाठी बी पाकीट पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख

असे असेल २५० पानांचे पुस्तक

पुस्तकात कोरोना साथीचा प्रादुर्भाव- प्रसार, साथीच्या काळात महापालिकेने त्यावर नियंत्रण कसे मिळवले. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी काय प्रयत्न केले. कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेले लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या मुलाखती, पुरविलेल्या विविध सेवा, स्बॅव टेस्टिंग, क्ष किरण तपासणी, फिरत्या बसमधून कोरोनाची चाचणी करण्यात आले. तसेच सीएसआर निधीतून मिळालेले साहित्य, पीपीई कीट, एन-९५ मास्क, वैद्यकीय उपकरणे, औषधे आदीचे करण्यात आलेले वाटप याची माहिती या पुस्तकातून मांडली जाणार आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'डॉक्टर आपल्या द्वारी', एकापेक्षा जास्त आजार असणाऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या उपाययोजना याचा या पुस्तकात समावेश असेल. २२० ते २५० पानाचे हे पुस्तक असणार असून, यासाठी मोठ्याप्रमाणात फोटोचाही वापर केला जाणार आहे.