BRT Pune Tendernama
पुणे

Pune : बीआरटी मार्गावरील 110 बस थांब्यांवर स्वयंचलित विजेचे दिवे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने पहिल्यांदाच बीआरटी मार्गावरील ११७ पैकी ११० बस थांब्यांवर स्वयंचलित विजेचे दिवे बसविले आहेत. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. तसेच, दिवे सुरु व बंद करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार नाही.

पीएमपी प्रशासनाने विजेवर होणाऱ्या खर्चात बचत करण्यासाठी स्वयंचलित दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी सात वाजता सुरु झालेले दिवे सकाळी सहा वाजेपर्यंतच सुरू राहतात. दिवे सुरु व बंद करण्यासाठी बटन चालू व बंद करण्याची गरज नाही. ही यंत्रणा टायमिंगवर (ठरवून दिलेली वेळ) सेट केली असल्याने संध्याकाळी सात वाजताच दिवे लागतात आणि सकाळी सहा वाजता बंद होतात. पुणे महापालिकेच्या हद्दीत २१ थांब्यांवर ही यंत्रणा बसविली आहे. संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर : ४, येरवडा-वाघोली : ७, स्वारगेट-कात्रज : १० अशा २१ थांब्यांवर दिवे बसविले आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील बीआरटी मार्गावरही असे दिवे बसविण्याचे काम सुरु आहे. यात निगडी-दापोडीसह अन्य काही मार्गांवर दिवे बसविणार आहे.

वीज व कर्मचाऱ्यांची बचत

पूर्वी संध्याकाळी व सकाळी दिवे चालू व बंद करण्यासाठी ज्या आगाराच्या हद्दीतील बस थांबा असेल त्या आगाराचे दोन कर्मचारी प्रत्येक बस थांब्यावर जाऊन दिवे सुरु व बंद करीत असतं. त्यासाठी त्यांना सकाळी व संध्याकाळी थांब्यावर जावे लागत असे. यात उशीर झाला तर दिवे सुरूच राहत होते. आता मात्र त्यांची गरज नाही. शिवाय कर्मचाऱ्यांची देखील आवश्यकता भासणार नाही.

पीएमपी प्रशासनाने पहिल्यांदाच बीआरटी मार्गावर स्वयंचलित विजेचे दिवे बसविले आहेत. त्यामुळे वीजेसह कर्मचाऱ्यांचीही बचत होणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रात २१ बस थांब्यावर असे दिवे बसविले आहेत. उर्वरित पिंपरी चिंचवडच्या क्षेत्रातील बीआरटी मार्गावर देखील दिवे बसविण्याचे काम सुरु आहे.

- अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे