Pune Municipal Corporation Tendernama
पुणे

Pune : महापालिकेने कचऱ्यावरून गृहनिर्माण सोसायट्या, संस्थांना दिला थेट इशारा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘‘शंभर किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांचा कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या कचरा प्रक्रिया संस्थांकडेच द्यावा, अन्यत्र कचरा दिल्यास कारवाई करू,’’ असा इशारा महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्या, संस्थांना दिला आहे.

महापालिकेच्या हद्दीमधील कचरा संकलन व वर्गीकरण करण्याचे काम स्वच्छ संस्थेमार्फत केले जाते. संकलन केलेला कचरा महापालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रांवर पाठवून तेथे त्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान, दररोज शंभर किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, संस्थांनी त्यांच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केलेले असूनही तसे होत नाही. तसेच सोसायट्यांकडून हे काम इतर संस्थांनाच दिले जाते. कचरा प्रक्रिया करण्याचे काम महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेला देण्याऐवजी खासगी ठेकेदारांना दिले जात आहे. संबंधित ठेकेदार सोसायट्यांचा कचरा उचलून शहराच्या एखाद्या भागात टाकतात. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न सुटत नाही, याउलट घनकचरा व्यवस्थापन विभागावरील ताण वाढत असल्याचे निदर्शनास आले, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

डॉ. खेमनार म्हणाले, ‘‘महापालिकेने कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या १७ संस्थांना मान्यता दिली आहे. त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर दिली जाईल. संबंधित सोसायट्या व संस्थांनी या मान्यताप्राप्त संस्थांकडे कचरा देणे बंधनकारक आहे. याशिवाय अन्य संस्था कचरा संकलन व प्रक्रिया करत असतील तर त्यांनी महापालिकेकडून मान्यता घ्यावी.’’ महापालिकेने मान्यता दिलेल्या १७ कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता असून दररोज किमान पाच टन कचऱ्याचे संकलन व प्रक्रिया त्यांच्याकडून केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.