Pune Tendernama
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला अखेर येणार गती कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला काही प्रमाणात वेग येण्याची शक्‍यता आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेकडून ७१ कोटी रुपयांचा निधी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे.

विकास आराखड्यानुसार कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटर रुंदीचा आहे. या रस्त्याच्या कामाला ऑक्‍टोबर २०१८ मध्ये मान्यता देण्यात आली. त्याचवर्षी राजस सोसायटी ते खडी मशिन चौकादरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. २०२१पर्यंत असलेल्या मुदतीत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. संबंधित रस्त्यासाठी ९४ हजार चौरस मीटर क्षेत्र संपादीत करावे लागणार आहे. त्यासाठी ३७५ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. महापालिकेने या रस्त्यांसाठी ७४ कोटी रुपये ठेवले आहेत, तर राज्य सरकारने १३९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे सध्या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी २१३ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे.

भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाते. त्यासाठी ३० टक्के रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे भरण्यासाठी ७१ कोटी रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग येण्याची शक्‍यता आहे. सध्या ६२ हजार ७०० चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन सुरू आहे. आणखी ९४ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादनाची गरज आहे. त्यासाठी ३७५ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.