Water supply Tendernama
पुणे

मर्जीतील ठेकेदारांसाठी पुणे महापालिकेचा नियमांनाच फाटा

पाणी पुरवठा, विद्युत, आरोग्य खात्याकडून विविध विकास कामांचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणी पुरवठा (Water Supply) विभागातील टेंडरचा (Tender) घोळ वाढतच चालला असून, या विभागाकडून ३९ टेंडर काढण्यात आली असून त्यापैकी ११ टेंडर ही पुरवठादारांसाठी काढण्यात आली आहेत. त्यामध्ये बहुतांश टेंडरमध्ये मर्जीतील ठेकेदारासाठी (Contractor) रजिस्ट्रेशनची अट टाकण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

स्वारगेट जलशुद्धीकरण केंद्रात मेकॅनिकल फिटींग पुरविणे, व्हॉल्व्ह अशा विविध प्रकाराच्या देखभाल दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये प्रशासनाने कशा प्रकारे घोळ घातला आहे. त्यावरून मर्जीतील ठेकेदारासाठी अटी-शर्तींमध्ये कशा प्रकारे बदल करण्यात आला, रजिस्ट्रेशनची अट कशाप्रकारे शिथिल करण्यात आली, हे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित पुरवठादार कंपनीकडून त्याच्या मोबदल्यात अधिकाऱ्यांना कशाप्रकारे ‘सेवा’ पुरविली जात असल्याची माहिती समोर आली होती.

महापालिकेतील पाणी पुरवठा, विद्युत, आरोग्य अशा विविध खात्याकडून विविध विकास कामांचे टेंडर काढण्यात आले. अन्य खात्यांनी काढलेल्या टेंडरमध्ये ठेकेदार कंपन्यांना महापालिका अथवा अन्य कोणत्या सरकारी खात्याचे रजिस्ट्रेशन बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पाणी पुरवठा खात्याच्या टेंडरमध्ये काही कामांसाठी ही अट ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुरवठादारासाठी मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे. वास्तविक टेंडर प्रक्रिया कशी राबवावी, याबाबतची नियमावली आहे. मात्र तिचा वापर सोयीनुसार प्रशासनाकडून केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मर्जीतील ठेकेदारासाठी नियमांना फाटा दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.