PMC Pune Tendernama
पुणे

Pune : वाकडेवाडी-बोपोडी आता अवघ्या सहा मिनिटांत, कसे काय?

बीआरटी; पीएमपीकडून मार्गाचे रुंदीकरण सुरु

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाकडेवाडी-बोपोडी मार्गावरील बसचा प्रवास आता वेगवान होईल. बीआरटीचा नवा मार्ग तयार झाल्यानंतर पाच किलोमीटरचे हे अंतर सहा मिनिटांत कापता येईल. सध्या या अंतरासाठी १३ मिनिटे लागतात. त्यामुळे सात मिनिटे वाचू शकतील. पुणे महापालिकेच्यावतीने या मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरु आहे. २१ मीटरचा रस्ता ४२ मीटरपर्यंत वाढविण्यात येईल हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्यांनतर बीआरटीचे काम सुरु होईल. त्यास आणखी सहा महिने लागतील. त्यामुळे प्रवाशांना आणखी किमान वर्षभर वाट पहावी लागेल.

पीएमपीच्या प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी गर्दीच्या मार्गांवर बीआरटी सेवा सुरु करण्यात आली. सध्या सात मार्गांवर ही बीआरटी गाड्या धावतात. काही मार्गांवरील बीआरटी सेवा चांगल्या स्थितीत आहे, तर इतर काही मार्गांवर दुरवस्था झाली आहे. नगर रस्त्यावरील तीन किलोमीटर अंतरावरील बीआरटी मार्ग काढून टाकण्यात आला. हडपसर मार्गावरील बीआरटी बंद अवस्थेत आहे. मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील दोन ते तीन थांबे बंद आहेत. उर्वरित मार्गावरून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. पुणे व पिंपरी चिंचवडच्या बीआरटीमधून दररोज ६७४ बस धावतात. यातून रोज सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होते.

बोपोडी ते वाकडेवाडी बीआरटी मार्ग
५ : किमीमध्ये अंतर
११ : एकूण बस थांबे
८० कोटी रुपये : अपेक्षित खर्च
२८९ : पीएमपीची बसची संख्या
१६२६ : दिवसभरातील फेऱ्या

पीएमपीचे बीआरटी मार्ग
१) नाशिक फाटा ते वाकड
२) निगडी ते दापोडी
३) सांगवी फाटा ते किवळे
४) संगमवाडी ते विश्रांतवाडी
५) येरवडा ते वाघोली
६) काळेवाडी फाटा ते चिखली
७) स्वारगेट ते कात्रज

‘बीआरटी’चा रोजचा प्रवास
६७४ : बीआरटीच्या धावणाऱ्या बस
६९.५ किमी : एकूण अंतर
१२४ : एकूण बस थांबे
१५९ : एकूण मार्ग
९११० : दिवसभरातील फेऱ्या
५ लाख ११ हजार : रोजची प्रवासी संख्या
१ लाख ७२ हजार ५४२ किलोमीटर : पीएमपी बसचा प्रवास
८३ लाख रुपये : दैनंदिन उत्पन्न

बीआरटीचे महत्त्व
पीएमपीच्या रोज सुमारे १६५० बस धावतात. प्रत्येक बस किमान २२५ किमी अंतर धावते. सर्व बस दिवसात एकूण सुमारे ३ लाख ६० हजार किमी अंतर धावतात. बसचा सरासरी वेग हा ताशी १३ किमी आहे. बीआरटीमधून धावणाऱ्या बसचा वेग सरासरी २६ किमी आहे. हा वेग तुलनेने दुप्पट आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होते. दुसरीकडे कमी बसच्या संख्येत जास्त फेऱ्या देणे शक्य होते. त्यामुळे बीआरटी प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरते.

वाकडेवाडी -बोपोडी दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. सहा महिन्यांत ते काम पूर्ण होईल. बीआरटीबाबतचा निर्णय पीएमपी प्रशासन घेईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महापालिका