PMC Pune Tendernama
पुणे

Pune : मिळकतकरातील 40 टक्क्यांच्या सवलतीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांसमोर 'या' आहेत अडचणी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मिळकतकराची 40 टक्क्यांची सवलत नसल्याने नागरिक महापालिकेवर टीका करतात, त्यामुळे महापालिकेतर्फे अशा नागरिकांच्या घरी जाऊन सवलत देण्यासाठी पीटी ३ अर्ज भरून घेत आहेत. मात्र, महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांना सोसायटीच्या आतमध्ये प्रवेश न देणे, दार न उघडणे, दार उघडले तरी प्रतिसाद न देणे या कारणांमुळे सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरू आहे. आत्तापर्यंत फक्त ४५ हजार ठिकाणाचे सर्वेक्षण झाले आहे.

महापालिकेकडून १९७० पासून मिळकतकरात ४० टक्‍के सवलत दिली जात होती, पण राज्य सरकारने केलेल्या ऑडिटमध्ये ही सवलत काढण्याचा निर्णय झाला. २०१९पासून १०० टक्के कर वसुली सुरू करण्यात आली. ज्या नागरिकांच्या एका पेक्षा जास्त सदनिका आहेत, त्यांचीही सवलत काढून घेण्यात आली. तसेच २०१९नंतर नविन सदनिका खरेदी करणारे नागरिक, समाविष्ट ३४ गावांतील नागरिकांना १०० टक्के कर लागलेला आहे. अशा सुमारे साडेचार लाख नागरिकांना सवलत मिळालेली नाही. ही सवलत पुन्हा देण्यात आलेली असली तरी अजून ३ लाख ७५ हजार नागरिकांनी अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे महापालिकेने २४ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी पीटी ३ अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेने ३७५ कर्मचारी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेणार आहेत. महापालिका स्वतःहून सवलत देण्यासाठी प्रयत्न करत असताना नागरिकांकडून मात्र प्रतिसाद दिला मिळत नाही.

उपायुक्‍त माधव जगताप यांनी या सर्वेक्षणाचा आढावा घेतला. त्यामध्ये ४५ हजार अर्ज भरून घेण्यात आले आहेत. नागरिकांकडून योग्य प्रकारची वागणूक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिली जात नाही, त्यामुळे हे काम संथगतीने सुरु आहे अशी तक्रार यावेळी बैठकीत करण्यात आली. जगताप म्हणाले, ‘‘४० टक्क्यांची सवलत नसलेल्या मिळकतधारकांच्या घरी जाऊन पीटी ३ अर्ज भरून घेतले जात आहेत. आत्तापर्यंत ४५ हजार अर्ज भरून झाले आहेत. पण अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची अडवणूक सुरू आहे. सर्वेक्षण करण्यासाठी सोसायटीमध्ये प्रवेश दिला जात नाही, महापालिकेकडून सोसायटीला पत्र द्या अशी सूचना केली जाते. अनेकांची घरे बंद आहेत, काही जण दार घडतात पण माहिती देत नाहीत असे प्रकार घडत आहेत.’’ नागरिकांनी या सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहनही जगताप यांनी केले.

पुन्हा संधी नाही

महापालिकेचे कर्मचारी घरी येऊनही पीटी ३ अर्ज भरून देण्यास सहकार्य केले नाही तर अशा मिळकतधारकांना ४० टक्क्यांची सवलत मिळणार नाही. जे नागरिक सहकार्य करणार नाहीत, त्या घटनेचा पंचनामा करून, शेजाऱ्यांना त्याची माहिती देऊन अहवाल सादर करा असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे जगताप यांनी सांगितले.