PUne Tendernama
पुणे

पुण्यात सर्वच रस्त्यांची चाळण अन् महापालिका म्हणते पेठांमध्ये एकही

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांची चाळण झालेले असताना पुणे महापालिकेच्या पत विभागाकडून अजब दावा करण्यात आला आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये एकही खड्डा पडल्याची नोंद महापालिकेकडे नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत या भागातील एकही खड्डा बुजविण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात पेठांमध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे पडले आहे. जे रस्ते केले आहेत त्यांची देखील खडी निघून खड्डे पडले आहेत. डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधील रस्तेही खराब झाल्याने हे रस्ते पुन्हा ठेकेदाराकडून करून घेण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केलेले आहे. मुसळधार पावसात खड्ड्यातून गाडी चालवताना नागरिकांची तारांबळ उडत आहे. रस्त्यावर जमा झालेले पाणी पादचाऱ्यांवर उडत आहे असे अनेक त्रास सध्या पुणेकरांना सहन करावे लागत आहेत. या त्रासाला पेठांचा भाग सुद्धा अपवाद नाही. येथेही मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्त्यांची पाहणी करून दुरुस्तीचे आदेशही दिलेले आहेत.

शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून, तीन-चार महिन्यांपूर्वी पेठांमधील तसेच उपनगरांमधील रस्त्यांचे डांबरीकरण केले होते, अशा रस्त्यांचीही चाळण झाली आहे. पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी जमा होत आहे. महापालिकेच्या या काराभाराविरोधात नागरिकांकडून तक्रारी सुरू झाल्या आहेत. आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्‍त्यांची पाहणी करून दुरुस्तीचे आदेशही दिले आहेत. गुरुवारी शहरातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पथ विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. टिळक रस्त्यावर टिळक चौक ते अभिनव चौकापर्यंतचे खड्डे बुजविले आहेत. पण, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या जुन्या इमारतीसमोर पाणी पुरवठ्याचे काम केले, तेथे खचलेल्या रस्त्याकडे दिवसभर प्रशासनाचे लक्ष गेले नाही. बाजीराव रस्ता, धायरी, सनसिटी रस्ता, सिंहगड रस्ता, बाणेर, म्हाळुंगे, वडगाव शेरी, शास्त्री नगर, पाषाण सुस रस्ता, जुना मुंबई पुणे रस्ता या भागातील खड्डे बुजविले आहेत.

पथ विभागाकडून रोज किती खड्डे बुजवायचे याचे उद्दिष्ट प्रत्येक कार्यकारी अभियंत्याला दिलेले आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता नेत्यांचे हद्दीतील खड्डे बुजवून त्याचा अहवाल मुख्य खात्याला सादर केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून आकडेवारीत पेठांमध्ये एकही खड्डा पडला नाही व बुजविलाही नाही अशी नोंद महापालिकेकडे झालेली आहे. प्रत्यक्षात सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ, कसबा, शुक्रवार पेठ, रविवार पेठ यासह इतर भागातील प्रमुख रस्त्यांसह लहान रस्त्यावर खड्डे पडले आहेत, ते बुजविले नाहीत. तरीही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

पेठांमधील रस्ते नुकतेच डांबरीकरण केले आहेत. जेथे पाणी पुरवठा व मलःनिसारण विभागाकडून काम झाले आहे, तेथे खड्डे पडले आहेत. पेठांमधील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. रोज किती खड्डे बुजविले ची माहिती दिली जाईल.

- राजेंद्र अर्धापूरे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग