पुणे (Pune) : पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) सात वाहनतळ चालविण्यासाठी नवे ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून, त्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी स्थायी समितीमध्ये मंजूर केले. तीन वर्षांसाठी हे ठेकेदार नेमलेले असून, यातून महापालिकेला प्रतिवर्षी अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
महापालिकेचे शहरात ३० वाहनतळ आहे, यापूर्वी १० वाहनतळ ठेकेदारास चालविण्यासाठी देण्यात आले असून, उर्वरित २० वाहनतळांसाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आली होती. त्यापैकी सात वाहनतळांच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली. पुणे स्टेशन येथील तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनतळाची स्वतंत्र निविदा मागविण्यात आली होती.
दुचाकीसाठीची १ कोटी ८ लाख रुपयांची मे. शारदा सर्व्हिसेसची टेंडर मंजूर केले, तर चारचाकी वाहनतळाची मे. डी. आर. सर्व्हिसेस या संस्थेची ८१ लाख रुपयांचे टेंडर मंजूर केले. गणेश पेठेतील अल्पना सिनेमासमोरील वाहनतळाची ४ लाख १० हजार रुपयांची अमित एन्टरप्राइजेसची, तर नारायण पेठेतील वाहनतळासाठीची कविता रामचंद्र मोरे यांची ६ लाख ४ हजार रुपयांचे टेंडर मंजूर केले. शुक्रवार पेठेतील भाऊ महाराज बोळातील पार्किंगची हिमाचल वेअर हाउसिंग प्रा.लि.ची १ लाख ८० हजार रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले. फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा येथील २५ लाख १५ हजार रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले, तर जंगली महाराज रस्त्यावरील पार्किंगसाठी पीबीपी ग्रुपने भरलेली २२ लाख ५२ हजार ८५५ रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे.