Pune Tendernama
पुणे

पुणे: कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्याच्यादृष्टीने मोठे पाऊल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्याच्यादृष्टीने महापालिकेकडून शुक्रवारी (ता. ९) एक पाऊल पुढे पडले. महालक्ष्मी लॉन्सची जागा ताब्यात येत नसल्यामुळे राजाराम पुलाच्या डाव्याबाजूने वारज्यापर्यंत जाणाऱ्या नदीकाठच्या रस्त्याचे काम गेल्या दहा ते बारा वर्षांहून अधिक काळ रखडले होते. आज ही जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेकडून राजाराम पूल ते वारज्यादरम्यान नदीकाठच्या रस्त्याचे काम हाती घेतले होते. वारज्यापासून अमृतकलश सोसायटीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, जागा ताब्यात न आल्यामुळे राजाराम पुलापर्यंत हे काम पूर्ण झाले नव्हते. यामुळे वाहतुकीचा सर्व भार हा कर्वे रस्त्यावर येत होता. ही जागा ताब्यात मिळावी, यासाठी माजी नगरसेवक शिवराम मेंगडे आणि राजाभाऊ बराटे यांचे अनेक वर्षांपासून महापालिकेकडे प्रयत्न सुरू होते, त्याला अखेर यश आले. या रस्त्यासाठी आवश्‍यक असलेली सुमारे दोन एकर जागा ८० टक्के टीडीआर आणि वीस टक्के रोख मोबदल्यात महापालिकेच्या ताब्यात आली.

या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता राजेंद्र थोरात म्हणाले, ‘‘राजाराम पूल ते वारजे जुना जकातनाक्यापर्यंत नदीकाठचा रस्ता प्रस्तावित आहे. रस्त्यासाठीची ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली. आणखी काही जागा ताब्यात येणे बाकी आहे. त्यांच्या जमीन मालकांशी बोलणे सुरू आहे. त्यामुळे तो प्रश्‍न निकाली निघून रस्त्याचे काम मार्गी लागेल.’’

दरम्यान, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. राजाराम पुलापासून थेट वारजे जुना जकात नाक्यापर्यंत नदीकाठने सलग रस्ता होणार आहे. त्यामुळे वारज्यावरून कर्वेनगरला येणाऱ्या, तसेच कर्वेनगरवरून वारज्याकडे जाणाऱ्या, वारजे, कर्वेनगर येथून राजाराम पुलावर जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे.