Pune Tendernama
पुणे

Pune : शहराची हद्द वाढल्याने डांबरीकरणासाठी उभारणार दोन नवे प्लांट; टेंडर प्रक्रिया...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहराची हद्द वाढल्याने डांबरीकरणाचे काम करताना गरम डांबर मिळावे, यासाठी दोन नवीन हॉट मिक्स प्लांट उभारले जाणार आहेत. शिंदेवाडीत एक जागा महापालिकेला मिळाली आहे; तर दुसरी जागा वारजे ते सूसदरम्यान असणार आहे. या प्लांटसाठी प्रत्येकी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

पुण्यात जुन्या हद्दीत एक हजार ४०० किलोमीटर; तर समाविष्ट गावांत सुमारे ६०० किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी एक हजार ६०० किलोमीटरचे रस्ते डांबरी आहेत. सध्या येरवड्यात महापालिकेचा एकमेव हॉट मिक्स प्लांट आहे. यातून दररोज सुमारे ४५० टन खडीमिश्रित डांबर तयार केले जाते. त्यापैकी १५० टन १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी; तर उर्वरित ३०० टन खडीमिश्रित डांबर मुख्य खात्यातर्फे वापरले जाते. येरवड्यातील प्लांट जुना झाल्याने तो वारंवार बंद पडल्याने शहरातील रस्त्यांची कामे खोळंबत आहेत. शहराची हद्द ५१८ चौरस किलोमीटरची आहे. येरवड्यातून कात्रज, वारजे, सूस, शिवणे, खडकवासला, हडपसर अशा भागांत खडीमिश्रित गरम डांबर पोहोचविणे महापालिकेपुढे आव्हान आहे. डांबर थंड झाल्यास रस्त्याच्या कामाला दर्जा राहत नाही. शहराला अन्य हॉट मिक्स प्लांटची गरज असल्याने जागांचा शोध सुरू होता. तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी नवीन प्लांट उभारणीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. महापालिकेने प्लांटसाठी जागेचा शोध सुरू केला असून शिंदेवाडीत एका जागा निश्‍चित केली आहे; तर पुण्याच्या पश्‍चिम भागात सूस, वारजे येथे काही जागा पाहिल्या आहेत. अन्य काही ठिकाणी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच एक जागा निश्‍चित केली जाणार आहे.

...तर तीन महिन्यांत प्लांट पूर्ण

दोन नव्या हॉट मिक्स प्लांटसाठी प्रत्येकी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातून प्रतितास १६० टन माल तयार होण्याची क्षमता असणार आहे. कार्यादेश निघाल्यानंतर तीन महिन्यांत प्लांट उभारणीचे काम पूर्ण होईल. या प्लांटच्या खर्चास अंदाज समिती व आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनीही मान्यता दिली आहे. त्याची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.