Pune Tendernama
पुणे

Pune : कोरेगाव पार्क, कल्याणीनगर परिसरातील कोंडी फुटणार; 'या' रस्त्याचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोरेगाव पार्क, कल्याणीनगर कॉर्नर परिसरात सातत्याने होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बंडगार्डन बंधारा ते मुंढवा या दरम्यानच्या नदीपात्रातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नदी सुधार प्रकल्पासमवेतच या रस्त्याचे देखील काम करण्यात येत असून, सध्या १२ टक्‍क्‍यांपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा, केशवनगर या भागात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मोठमोठी कार्यालये, आयटी कंपन्या, शाळा, महाविद्यालये, पासपोर्ट कार्यालय अशा विविध प्रकारच्या आस्थापनांच्या संख्येत मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात भर पडली. मात्र, या परिसरातून जाण्यासाठी कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रस्त्यावरील लेन नंबर-७ येथील रस्ता तसेच कल्याणी चौकापासून पुढे हॉटेल वेस्टीनसमोरील रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना दररोज वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी पालिकेने एकीकडे मुख्य रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेत असतानाच, दुसरीकडे वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने बंडगार्डन बंधारा ते मुंढव्यापर्यंत नदी पात्रातून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला होता.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात नदी सुधार प्रकल्पासमवेतच संबंधित रस्त्याचे काम करण्यास मान्यता मिळाली. निविदा प्रक्रिया राबवून आता रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याच्या कामासाठी काही खासगी जमिनींचा ताबा पालिकेला मिळाला आहे. तर रस्त्याच्या कामात वनविभागाची जागा आली असून, त्यांना जागेबाबत महापालिकेने प्रस्ताव पाठविला आहे. संबंधित जागेवर काही प्रमाणात झाडे असून, त्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप पालिकेला मिळाले नाही. त्यासाठीचा प्रस्तावही पालिकेने संबंधित विभागाला पाठविला आहे. नदी सुधार प्रकल्प व संबंधित रस्ता अशा एकत्रित कामासाठी ६०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रस्त्याची वैशिष्ट्ये...

रस्त्याची लांबी-पाच किलोमीटर

एकेरी वाहतुकीसाठी रस्ता उपयोगात आणण्याची शक्‍यता

मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार

नदी सुधार प्रकल्पामुळे रस्त्याच्या कामाला वेग येण्याची शक्‍यता

तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू

नदी सुधार प्रकल्पासमवेतच बंडगार्डन बंधारा ते मुंढव्यापर्यंत नदीपात्रातून रस्ता तयार केला जात आहे. खासगी जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. झाडांबाबत पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी प्रस्तावही सादर केला आहे. त्याबाबतचा निर्णयही लवकरच होईल.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, महापालिका