garbage Tendernama
पुणे

Pune : सुक्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार; हांडेवाडीत २५ टनांऐवजी ७५ टन क्षमतेचा प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहरातील सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हांडेवाडी येथे २५ टनांऐवजी ७५ टन क्षमतेचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. तसेच रामटेकडी येथील प्रकल्पाची मुदत संपल्याने नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे काम एकाच कंपनीला मिळाले आहे. हांडेवाडी येथील प्रकल्पासाठी ५७ कोटी ५९ लाख आणि रामटेकडी येथील प्रकल्पासाठी २९ कोटी ४७ लाख रुपये मोबदला ठेकेदाराला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाल्याने दैनंदिन २३०० ते २४०० टन कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेला सुक्या कचऱ्यावरील प्रकल्पाची क्षमता वाढविणे आवश्‍यक होते. हांडेवाडी येथे महापालिकेचा सध्या प्रतिदिन २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प होता, पण याची क्षमता आता ७५ टन करण्यात आली आहे. यासाठी राबविलेल्या टेंडर प्रक्रियेत आदर्श भारत एनवायरो प्रा. लि ही कंपनी पात्र झाली. त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला असता, तो मान्य करण्यात आला आहे. हांडेवाडी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी बांधकाम करणे, नवीन यंत्रसामग्री बसविण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पहिल्या वर्षासाठी प्रति मेट्रिक टन ५९९ रुपये टिफींग फी दिली जाणार आहे. तसेच त्यात दरवर्षी नऊ टक्के वाढ केली जाईल. १५ वर्षांसाठी हा प्रकल्प चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यासाठी सर्वांत कमी दराने ५७ कोटी ५९ लाख रुपयांची टेंडर प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केली.

रामटेकडी येथील सुक्या कचऱ्याच्या ७५ टनाच्या प्रकल्पासाठी टेंडर राबविली होती, त्यात आदर्श भारत एनवायरो प्रा. लि. याच कंपनीला १० वर्षांसाठी काम मिळाले आहे. नवीन यंत्रसामुग्री बसविणे, देखभाल दुरुस्ती आणि स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी प्रथम वर्षासाठी प्रति मेट्रिक टन ५९९ रुपये टिफींग फी आणि पुढील प्रत्येक वर्षी नऊ टक्के वाढ दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टेंडरमधील तरतुदी

- दोन्ही प्रकल्पांतील रिजेक्ट कचऱ्याची वाहतूक व विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदाराची

- प्रकल्पाचा वीजखर्च ठेकेदाराला उचलावा लागणार, यापूर्वी महापालिका वीज बिल भरत होती

- प्रकल्पाच्या ठिकाणी महापालिका सुका कचरा आणून देणार

- महापालिकेची हद्द वाढल्याने सुक्या कचऱ्याची प्रक्रिया करण्याची क्षमता ५० टनांनी वाढली