Pune Tendernama
पुणे

पुणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका; 'या' 32 रस्त्यांवर राबविणार...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या समन्वयातून शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवरील चौकांमध्ये वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी अभिनव योजना राबविण्यात येणार आहे. तसेच गुगलसमवेत करार करून वाहतुकीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि महापालिकेचे मुख्य अभियंता (पक्ष विभाग) अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहतुकीची गती संथ होते. त्याचा ताण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर येतो. मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी चौकांमध्ये सुधारणा, अद्ययावत सिग्नल यंत्रणा, पार्किंग व्यवस्थापन, गतिरोधक, रस्त्यांची रचना, रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, वाहतूक नियंत्रणाची साधने बसविणे, मिसिंग लिंक्स पूर्ण करणे, पाणी साठणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, नो-हॉकर्स झोन, रस्त्यांवरील अडथळा आणणाऱ्या आस्थापनांवर कारवाई अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मोबाईल ॲप विकसित करणार

शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेकडून स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार आहे. त्याद्वारे मुख्य रस्त्यांवरील सुधारणा व नियोजन करण्यात येणार आहे. भविष्यात या अॅपद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि नियोजन करण्यात येणार आहे.

अपघातांचे प्रमाण कमी करणार

शहरातील पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी, वाहतुकीत बदलांबाबत सूचना, बस थांबे, ऑटो स्टँड, पीएमपी थांबे आवश्यक माहिती मिळण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून गुगलसमवेत करार करण्यात येणार आहे. मानवी व अभियांत्रिकी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. जखमींना उपचार मिळण्यासाठी लागलेल्या कालावधीबाबत विश्‍लेषण करण्यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनची मदत घेण्यात येत आहे, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी सांगितले.

या उपाययोजना करणार

वाहतुकीचा वेग ताशी दहा किलोमीटरवरून २० किलोमीटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न

अतिक्रमण, खड्डे, यू-टर्न, अद्ययावत सिग्नल यंत्रणेबाबत उपाययोजना

शहर वाहतूक शाखेचे सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालये एकत्रित काम करणार

ॲपच्या माध्यमातून वाहतूक कोंडी आणि तक्रारींचे निवारण

रस्त्यांवरील वाहतुकीची क्षमता वाढविणार