पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने निकृष्ट पद्धतीने केलेल्या रस्त्याच्या कामाची किंमत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना मोजावी लागणार आहे. सध्या शहरातील खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. पण चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
गेले वर्षभर पुण्यात समान पाणी पुरवठा योजना, मलःनिसारण, मोबाईल केबल, विद्युत केबल यासह इतर कारणांमुळे रस्ते खोदाई झाली आहे. ही रस्ते खोदाई झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करताना ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून चांगल्या दर्जाचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे रस्ते खचत आहेत, खड्डे पडत असल्याने रस्त्यांची चाळण झाली. तसेच गेले वर्षभर रस्त्याचे डांबरीकरण करताना योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने या रस्त्यांवर अवघ्या काही महिन्यात खड्डे पडले आहेत. ही कामे संबंधित ठेकेदार व पथ विभागाकडून करण्यात आलेले आहेत.
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘पुणे शहरातील खड्डे गेल्या आठवडाभरापासून बुजविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे एक पथक आहे. तसेच जेट पॅचर मशिनने रोज ४० ते ४५ खड्डे बुजविले जात आहेत. पाऊस थांबल्याने खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले जात आहे. जे रस्ते निकृष्ट पद्धतीने झाले आहेत, त्याला जबाबदार अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांची माहिती मागवली आहे. उपनगरांमधील खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक आहे, तेथे वेगात काम करण्याचे आदेश दिले आहेत.’’
१२० रस्ते दोष दायित्व कालावधीतील
पुणे शहरातील १२० रस्ते दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) आहेत. त्यामुळे या कालावधीत रस्ते खराब झाली असतील तर ते पुन्हा दुरुस्त करून देणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली असती तरी १२० पैकी २० ते २५ रस्त्यांची रस्ते खोदाईमुळे चाळण झालेली आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झाली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी (ता. २०) आंदोलन करण्यात आले. स्वारगेट येथील पीएमटी डेपोबाहेरील रस्त्यावर खड्ड्यांमध्ये कागदी होड्या, रबरी बदक, खेकडे, मासे सोडून आंदोलन करण्यात आले. निकृष्ट पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, गेली पाच वर्ष महापालिकेत सत्तेत राहिलेल्या भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.