Pune Metro Tendernama
पुणे

Pune : भीक नको पण कुत्रे आवर! मेट्रोच्या कामांमुळे पुणेकर हैराण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मेट्रो प्रकल्पाच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यातील मार्गाचे उद्‍घाटन होऊन सहा मार्चला एक वर्ष पूर्ण होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांतील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केलेल्या या मेट्रोने उद्‍घाटनानंतरच्या वर्षभरात एक इंचही पुढे धाव घेतलेली नाही. आता नागरिकांचा मेट्रोबद्दलचा उत्साह साफ मावळला आहे. उलट, मेट्रोच्या कामामुळे महिनोन महिने रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी वाढत चालल्याने नागरिक विलक्षण त्रस्त झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन २४ डिसेंबर २०१६ ला झाले. पहिल्या टप्प्यातील बारा किलोमीटरचा मेट्रो मार्ग तयार होण्यास पुढची सहा वर्षे लागली. सहा मार्च २०२२ मध्ये पुण्यात वनाज ते गरवारे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी ते फुगेवाडी अशा मार्गाचे पंतप्रधानांच्याच हस्ते लोकार्पण झाले. आता, प्रकल्पाचे सातवे वर्ष सुरू आहे. उद्‍घाटन झालेल्या पाच आणि सात किलोमीटरच्या मार्गावर अर्धवट प्रवासापेक्षा नागरिक रस्ते प्रवासावरच समाधानी आहेत. परिणामी, मेट्रो सोशल मीडियावरचे ‘मिम्स’ आणि नवख्यांसाठी फोटोसेशनपुरती उरली आहे.
या साऱ्या दिरंगाईला, वाहतूक कोंडीमुळे त्रस्त लाखो लोकांच्या मनस्तापाला आणि दिवसागणिक वाढत असलेल्या खर्चाला जबाबदार कोण, या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्य पुणेकरांना मिळत नाही. या त्रासाबद्दल दाद कुणाकडे मागायची, या विवंचनेत अर्धवट अंतरावर धावणारी रिकामी मेट्रो डोक्यावर घेऊन रस्त्यावरच्या तुफान कोंडीत कर्वेनगर अडकले आहेत. २०२२ मध्ये सुरू होणारे मार्ग २०२३ च्या पहिल्या तिमाहीतही सुरू झालेले नाहीत.

महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांच्या मते पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोच्या मार्गांचे काम वेगात सुरू आहे. मार्चअखेर तीन मार्गांचे काम पूर्ण होईल, असा त्यांचा दावा आहे. ते म्हणाले, ‘‘तीन मार्गांच्या कामाच्या पूर्ततेनंतर सुरक्षाविषयक प्रमाणपत्र मिळाल्यावर मेट्रो प्रवाशांसाठी खुली होईल. विविध कारणांमुळे विलंब झाला तरी, उर्वरित कालावधीत वेगाने काम पूर्ण होईल, याची खात्री आहे.

‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’चे हर्षद अभ्यंकर यांनी मेट्रोच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले. काम लांबल्यामुळे रस्त्यावर राडारोडा वाढत आहे. बांधकामांमुळे रस्त्यावरच्या धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार वाढू लागले आहेत. आर्थिक पाठबळ असूनही काम वेगाने होत नाही, असे अभ्यंकर यांनी सांगतिले.

सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासिका प्रांजली देशपांडे-आगाशे यांनी मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवरील बॅरिकेडिंगमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले. प्रकल्पाला विलंब होत असल्यामुळे त्याचा आर्थिक बोजा शहरातील नागरिकांवर पडत आहे. नागरिकांना होणारा त्रास असह्य आहे. भूसंपादनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महामेट्रोने मिळालेल्या अधिकारांचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत ‘परिसर’चे रणजित गाडगीळ यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी वाढलेल्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी कधीही अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षात झालेल्या विलंबाची कारणे
- खडकीतील संरक्षण खात्याची जागा मिळण्यास विलंब
- पुरामुळे मुठा नदीपात्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काम बंद
- संभाजी पुलावरील मेट्रो मार्गाबद्दल गणेश मंडळांच्या वादामुळे सुमारे ४ महिने काम बंद
- खडी विक्रेत्यांच्या संपामुळे जानेवारीत १५ दिवस काम बंद

आश्वासनांना तारीथ पे तारीख
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील - १७ नोव्हेंबर २०२२
- महामेट्रोचे अधिकारी - २५ नोव्हेंबर २०२२
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील - २ डिसेंबर २०२२
- महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, ब्रीजेश दीक्षित - ३१ डिसेंबर २०२२