Pune City Tendernama
पुणे

Pune Metro : आता निगडीतूनही सुरू करता येणार मेट्रोचा प्रवास; फक्त...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे मेट्रोच्या (Pune Metro) बहुचर्चित पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी पिंपरी) ते निगडीतील भक्तीशक्ती चौक या विस्तारित मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मार्गाचे टेंडर (Tender) प्रसिद्ध झाले असून, तीन वर्षे तीन महिन्यांत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच निगडीपर्यंत मेट्रो यायला किमान साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या मार्गामुळे चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डीगाव, निगडीगाव, प्राधिकरण, यमुनानगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखलीसह रावेत, किवळे भागातील नागरिकांची सोय होणार आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पुण्यातील वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन अशा दोन मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. सध्या दोन्ही मार्गिका मिळून २४ किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. उर्वरित नऊ किलोमीटर मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्याचे मेट्रोचे नियोजन आहे.

सध्या पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या उन्नत मार्गाचे आणि सिव्हिल कोर्ट स्थानक ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट स्थानकात भेटतात. त्यातील स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेमधील प्रवाशांच्या दृष्टीने पिंपरी ते निगडी (भक्तीशक्ती चौक) या मार्गाच्या विस्तारीकरण महत्त्वाचे आहे. त्याचे टेंडर महामेट्रोने प्रसिद्ध केलो आहे.

('टेंडरनामा'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दृष्टिक्षेपात पिंपरी-निगडी मार्ग

- २३ ऑक्टोबर २०२३ रोजी केंद्र सरकारची मान्यता

- पिंपरी-निगडी मार्गाची लांबी ४.५१९ किलोमीटर

- मार्गिकेचा अपेक्षित खर्च ९१०.१८ कोटी रुपये

- मार्गाच्या व्हायाडक्टच्या कामाचे टेंडर प्रकाशित

- संपूर्ण मार्गाच्या कामाची मुदत तीन वर्षे तीन महिने

असे आहे नियोजन

- पिंपरी-निगडी मार्गिकेचे बांधकाम स्वीकृती पत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यात काम पूर्ण करणे बंधनकारक

- संपूर्ण मार्ग उन्नत असून, चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक अशी चार स्थानके असतील

- टेंडरची माहिती www.punemetrorail.com या संकेतस्थळावर व https://eprocure.gov.in या सीपीपी संकेतस्थळावर उपलब्ध

- मार्गिकेचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी व्हायाडक्ट बांधण्याबरोबरच ठेकेदाराला स्थानकाचे कोनकोर्स व फलाटाच्या स्लॅबचे काम करावे लागणार

स्थानकांतील अंतर

पिंपरी ते चिंचवड ः १.४६३ किलोमीटर

चिंचवड ते आकुर्डी ः १.६५१ किलोमीटर

आकुर्डी ते निगडी ः १.०६२ किलोमीटर

निगडी ते भक्तीशक्ती चौक ः ९७५ मीटर

स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. पिंपरीपासून निगडीतील भक्तीशक्ती चौकापर्यंत हा मार्ग असेल. या विस्तारित मार्गिकेमुळे चिंचवड (स्टेशन), आकुर्डी (खंडोबा माळ), निगडी (टिळक चौक) आणि भक्तीशक्ती चौक निगडी हे विभाग मेट्रोला जोडले जाणार आहेत. यामुळे त्या भागातील हजारो नागरिकांना मेट्रोचा लाभ मिळणार आहे.

- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो