Nagar Road Tendernama
पुणे

Pune : वाहतूक कोंडीने वैतागलेल्या नगर रस्त्यावरील प्रवाशांना मिळणार मेट्रोची कनेक्टिव्हिटी

Metro : नगर रस्ता मेट्रोला ‘कनेक्ट’; प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील रूबी हॉल ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे आणि पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचेही काम बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या उद्‍घाटनाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे. (Pune Metro, Pune Airport News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी सातारा येथे येणार आहेत. त्या दरम्यान, पुण्यातील मेट्रो, विमानतळ प्रकल्पांचे उद्‍घाटन करून लहूजी वस्ताद स्मारकाचे भूमिपूजन ते करतील, अशी सध्या चर्चा आहे. परंतु, महामेट्रो, पुणे विमानतळ प्रशासन यांच्यापर्यंत याबाबतची ठोस माहिती नाही. तर, लहूजी वस्ताद स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे संयोजकांकडून सांगितले जात आहे.

महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आता केव्हाही उद्‍घाटन शक्य आहे. तर, विमानतळ विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता उद्‍घाटनाची प्रतीक्षा असल्याचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.

पुणे शहरात मेट्रोच्या पिंपरी चिंचवड-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१६ मध्ये सुरू झाला. वनाज-रामवाडी हा टप्पा आता पूर्णत्वास आला आहे. तर, पिंपरी चिंचवड-स्वारगेट मार्गावर शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान चार किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे.

सध्या त्याचे काम सुरू आहे. ते काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे महामेट्रोचे म्हणणे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुणे शहरातील पहिल्या टप्प्यातील सुमारे ३१ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. त्यासाठी केंद्र सरकारने ११ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अशी आहे स्थिती

- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पास प्रारंभ - डिसेंबर २०१६

- वनाज- गरवारे कॉलेज आणि पिंपरी चिंचवड - फुगेवाडी - मार्गाचे उद्‍घाटन - ६ मार्च २०२२

- गरवारे कॉलेज ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे उद्‍घाटन - १ ऑगस्ट २०२३

- रूबी हॉल ते रामवाडी - काम पूर्ण परंतु, उद्‍घाटन अनिश्चित

नगर रस्ता मेट्रोला ‘कनेक्ट’ होणार

रूबी हॉल ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सुमारे ५.५ किलोमीटरचा आहे. त्यात बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी स्थानकाचा समावेश आहे. यातील येरवडा वगळता उर्वरित तिन्ही स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. उद्‍घाटनानंतर प्रवाशांना वनाजवरून थेट नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. तसेच शिवाजीनगर स्थानकात मेट्रो बदलून पिंपरी चिंचवडपर्यंतही जाता येईल. या मार्गामुळे नगर रस्त्यावरील प्रवाशांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.