PMC Pune Tendernama
पुणे

Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारणार; 47 लाखांचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : डेक्कन जिमखाना येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. यासाठी ४७ लाख २७ हजार रुपयांचा खर्च येणार असून, या टेंडरला पुणे महापालिकेच्या (PMC) स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली.

संभाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या वर मेघडंबरी उभारण्यात यावी, अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा पाहणी करून त्याचा प्रस्ताव तयार केला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यावर पॉलिस्टर रेझिनचा वापर करून आकर्षक मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उभे राहता यावे, यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे.

या ठिकाणी दगडी बांधकामामध्ये सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी भवन विभागाने टेंडर प्रक्रिया राबविली. त्यात तीन टेंडर आले. त्यापैकी पूर्वगणनपत्रकाच्या रकमेपेक्षा साडेपाच टक्के कमी दराने आलेल्या टेंडरला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर म्हणाले, ‘‘या कामात मेघडंबरीसह, जिने व चौथऱ्याच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी ४७ लाख २७ हजार खर्च येणार आहे. कामाची मुदत तीन महिन्यांची आहे.’’