Stamp Duty Tendernama
पुणे

Pune: अनेकांचा गुढीपाडव्याला घर खरेदीचा मुहूर्त चुकला; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत खरेदी केलेल्या मालमत्तेच्या दस्ताची नोंदणी (Stamp Duty) करण्यात, तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस आर्थिक बाबींची पूर्तता करण्यात असलेला स्टॅम्पचा (Stamp) अडथळा मंगळवारपासून दूर झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे १४ मार्चपासून स्टॅम्पचा पुरवठा खंडित झाला होता. स्टॅम्प न मिळाल्याने या काळात अनेकांच्या घर खरेदीची प्रक्रिया खोळंबली होती. ती आता पूर्ववत होत आहे.

मुहूर्त साधत घर किंवा इतर मालमत्तेची खरेदी करत बऱ्याचदा गुढीपाडव्याला ताबा घेण्यात येतो. मात्र ताबा घेण्यापूर्वी मालमत्तेची नोंदणी करणे आवश्यक असते. त्यात बँकेचे कर्ज असेल तर स्टॅम्प हा महत्त्वाचा ठरतो. तसेच आर्थिक वर्षाच्या सुरवातीला (एक एप्रिल) चालू बाजारमूल्य दरांत (रेडी रेकनर) वाढ होण्याची शक्यता असल्याने जमीन आणि सदनिकेच्या दस्त नोंदणीसाठी मार्चअखेरीस मोठी गर्दी होते.

मात्र जुन्या पेन्शन योजनेच्या संपामुळे स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक मालमत्तादारांच्या खरेदीच्या व्यवहाराची प्रक्रियाच पार पडली नाही. मात्र आता संप मिटल्याने मंगळवारी (ता. २१) दुपारनंतर स्टॅम्पचा पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, बुधवारी (ता. २२) गुढीपाडव्याची आणि त्यानंतर या महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २५ तारखेला सुटी आहे. त्यामुळे नोंदणीसाठी पुन्हा उशीर होण्याची शक्यता नाकारता येत आहे.

असा होतो स्टॅम्पचा पुरवठा
नाशिकमध्ये स्टॅम्पची छपाई केले जाते. तेथून ते मुंबईत असलेल्या मुद्रांक विभागाच्या कार्यालयात पाठवले जातात. त्यानंतर तेथून प्रत्येक जिल्ह्यात वितरण केले जाते. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या कोषागार कार्यालयीन मुद्रांक शाखेत हे स्टॅम्प येतात. तेथून पुण्यातील ११३ शासन मान्य व्हेंडरकडे पुरवठा केला जातो. त्यानंतर ते नागरिकांना खरेदी करता येतात. ही यंत्रणा संपामुळे पुरती विस्कळित झाली होती.

संपाचा असा झालेला परिमाण
- अनेकांच्या मालमत्ता खरेदीची प्रक्रिया लांबली
- मालमत्तेचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ताबा मिळाला नाही
- मुद्रांक विभागाचे व्यवहार मंदावले
- स्टॅम्पसाठी अनेकांना धावपळ करावी लागली
- व्हेंडरच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम

संपामुळे १४ मार्चपासून स्टॅम्प मिळणे कमी होत गेले. १५ मार्चपासून स्टॅम्पचा मोठा तुडवला भासू लागला होता. २१ मार्चला दुपारपर्यंत हीच परिस्थिती होती. त्यामुळे अनेकांच्या मालमत्तांची नोंदणी रखडली. तसेच स्टॅम्प मिळण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागली. मंगळवारपासून स्टॅम्पचा पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारचे स्टॅम्प नागरिकांना गुरुवारपासून खरेदी करता येतील.
- राहुल नाईक, सचिव, शासन मान्य मुद्रांक विक्रेता दस्तलेखक महासंघ

मी एक सदनिका विकत घेतली आहे. तिच्या नोंदणीसाठी मला ५०० रुपयांचे चार स्टॅम्प आवश्यक होते. त्यासाठी मी सोमवारी (ता. २०) पाच ते सहा व्हेंडरकडे चौकशी केली. मात्र मला एकाही ठिकाणी स्टॅम्प मिळाला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव नोंदणीचे काम पुढे ढकलावे लागले. आता मला गुरुवारी (ता. २३) सर्व प्रक्रिया पार पाडावी लागेल.
- सुशांत पांडे, नागरिक