Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune: 15 ते 20 एप्रिल चांदणी चौकातील वाहतुकीत मोठा बदल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम १५ ते २० एप्रिल या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत चौकातील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

चांदणी चौकातील नवा उड्डाण पूल आणि रस्त्याचे उद्‍घाटन १ मे रोजी करण्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर कामे वेळेवर आणि गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी परिसरात १५ मार्चला भेट देऊन कामांची पाहणी केली होती.

जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यासाठी १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असून या मार्गाची माहिती नागरिकांनी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी दिली.

चांदणी चौक परिसरातील नवा उड्डाण पूल आणि तेथील रस्त्यांचा एनएचएआयकडून आढावा घेण्यात आला.