पुणे (Pune) : महावितरणकडे (MahaDiscom) सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुण्यासह पाचही जिल्ह्यातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ८० लाख ४१ हजार १८९ ग्राहकांना ११४ कोटी ६६ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. यामध्ये मे महिन्याच्या वीजबिलांमध्ये ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा परतावा समायोजित करून देण्यात आला. जून महिन्याच्या बिलामध्ये उर्वरित २२ कोटी ३ लाख रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.
जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी पुणे जिल्ह्यातील ३९ लाख २ हजार २६ वीजग्राहकांना ७१ कोटी १३ लाख, कोल्हापूर जिल्हा- ११ लाख ८६ हजार ७२४ वीजग्राहकांना १४ कोटी ६८ लाख, सांगली जिल्हा ९ लाख ७ हजार ६१० वीजग्राहकांना ८ कोटी ३० लाख, सातारा जिल्हा- ९ लाख ९१ हजार ९९१ वीजग्राहकांना ९ कोटी ९१ लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ८३८ वीजग्राहकांना १० कोटी ६४ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.
सुरक्षा ठेवीचे बिल
गेल्या एप्रिलमध्ये पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत संबंधित वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीचे बिल भरून ग्राहकांनी सहकार्य करावे असे, आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.