पुणे (Pune) : PMP ‘पीएमपी’च्या रेंगाळणाऱ्या प्रवासाचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना आता ‘सुपरफास्ट’ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून ‘पीएमपी’ने शहरांतील निवडक २० मार्गांवर विनावाहक व विनाथांबा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिका ते भोसरी या मार्गावर सेवेचे उद्घाटन रविवारी ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते झाले. या आठवड्यात सेवेचा विस्तार होईल. ‘सुपरफास्ट’ सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल. पहिल्यांदाच विनावाहक, विनाथांबाचा प्रयोग करण्यात आला आहे.
प्रवाशांना आपल्या कार्यालयात अथवा इच्छित स्थळी जलद पोचावे अशी इच्छा असते. मात्र, मार्गातील सिग्नल, वाहतूक कोंडी व थांब्यावर थांबणाऱ्या बसमुळे जलद प्रवासाच्या इच्छेला ‘ब्रेक’ लागतो. प्रवाशांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी विनाथांबा व विनावाहक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी पुणे महापालिका ते भोसरी या मार्गावर पहिल्या सेवेचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, कामगार व जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे, भोसरी डेपो मॅनेजर भास्कर दहातोंडे, न. ता. वाडी आगाराचे व्यवस्थापक संतोष किरवे आदी उपस्थित होते.
अशी आहे सेवा
- सध्या पुणे महापालिका ते भोसरी या प्रवासासाठी सुमारे ४५ मिनिटे लागतात.
- विनाथांबा सेवेमुळे हा प्रवास २० ते २२ मिनिटांत पूर्ण होईल.
- यात चालकच वाहकाचे करेल.
- बस सुटण्यापूर्वीच प्रवाशांना चालकाकडून तिकीट दिले जाईल.
- २० निवडक मार्गावर अशी सेवा सुरु केली जाईल.
- पुणे महापालिका ते भोसरी या मार्गावर दोन बसच्या माध्यमातून सेवा.
- वातानुकूलित बसचा वापर, तिकीट दरात कोणतेही वाढ नाही.
विनावाहक व विनाथांबा सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असलेल्या सुमारे २० निवडक मार्गावर ही सेवा सूर केली जाईल.
- विजय रांजणे, वाहतूक नियोजन अधिकारी, पीएमपीएमएल, पुणे