Dehuroad Cantonment Board Tendernama
पुणे

Pune: लाखोंचा खर्च पाण्यात; स्मार्ट स्वच्छतागृहे धूळखात पडून

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देहूरोड कॅन्टोन्मेंटच्यावतीने (Dehuroad Cantonment Board) नागरिकांच्या सोयीसाठी किन्हई, शितळानगरसह अन्य वॉर्डमध्ये लाखो रुपयांची टेंडर (Tender) काढून, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे स्मार्ट युनिट बसविण्यात आले होते. सध्या बहुतेक वॉर्डमधील युनिटचा नागरिकांकडून न होणारा वापर आणि कॅन्टोन्मेंटच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता आणि देखभालीअभावी धुळखात पडून आहेत.

किन्हई येथे इंद्रायणीनदी काठावरील दशक्रिया विधी शेडनजीक चार युनिट तर शितळानगर क्रमांक एकमध्ये दोन युनिटचे स्वच्छतागृह बसविण्यात आले होते. सुरवातीला काही दिवस या युनिटचा वापर नागरिकांकडून करण्यात आला. मात्र, सध्या स्वच्छतेअभावी नागरिकांकडून या युनिटचा वापर केला जात नाही. सध्या कॅन्टोन्मेंट हद्दीत जिथे ही युनिट्स बसवण्यात आली आहेत ती सर्वच धूळखात पडून आहेत.

नागरिकांच्या कररूपी पैशातून हे युनिट बसविण्यात आले. त्याचा वापर करण्याच्या दृष्टीने कॅन्टोन्मेंटच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांच्या कार्यकाळात या स्मार्ट स्वच्छतागृहांच्या युनिटचे काम झालेले आहे.

स्वच्छतागृह सध्या अडगळीत आहेत. त्याच्या दुरुस्तीसह परिसर ठीकठाक करावा आणि रस्ता करावा. त्यामुळे किन्हई गावात ज्यांच्याकडे स्वच्छतागृह नाही, अशा कुटुंबांतील सदस्यांना त्याचा वापर करता येईल.

- सुहास पिंजण, बँक अधिकारी

शितळानगर येथे कॅन्टोन्मेंटने दोन युनिटचे स्मार्ट स्वच्छतागृह व ‘आरसीसी’मधील अजून चार युनिटचे स्वच्छतागृह बांधले होते. मात्र, स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती अभावी या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कॅन्टोन्मेंट आरोग्य विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे.

- खुदुस खान, सामाजिक कार्यकर्ते

स्वच्छ भारत योजनेंतर्गत कॅन्टोन्मेंटच्या एकूण सात वॉर्डांमध्ये काही ठिकाणच्या वॉर्डचा अपवाद वगळता अन्य वॉर्डमध्ये अशी स्वच्छतागृहे बसविण्यात आली होती. त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने रिटेंडर काढण्याचे प्रयत्न आहेत.

- एम. ए. सय्यद, आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभाग कॅन्टोन्मेंट