पुणे (Pune) : माळवाडी परिसरातील राजर्षी शाहू संकुलातील कै. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. निधीची कमतरता, वेगवेगळ्या विभागातील समन्वयाचा अभाव आणि कामाबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहे. बारा वर्षे उलटूनही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने या नाट्यगृहात किमान एखादा तरी प्रयोग अनुभवता येणार की नाही, असा प्रश्न स्थानिक कलाकार आणि नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या माध्यमातून माळवाडी परिसरात राजर्षी शाहू संकुलासह त्यातील नाट्यगृहाचे काम २००९ मध्ये सुरू झाले आहे. सुरूवातीच्या काळात या कामावर सुमारे ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर हे काम रखडले.
दरम्यान, झालेल्या कामाची पुन्हा दुरवस्था झाली. एवढेमोठे काम होऊनही केवळ अंतर्गत कामासाठी निधी उपलब्ध न झाल्याने सात-आठ वर्षे इमारत धूळखात पडली आहे. त्यावेळी उमेदीच्या काळातील स्थानिक कलाकार व रसिकांनी नाट्यगृह होत असल्याचा आनंद साजरा केला होता. ते लवकर होईना म्हणून आंदोलनेही केली. मात्र, अजूनही ते अपूर्णच असल्याने आता आम्हाला त्याचा काय उपयोग, किमान पुढच्या पिढीला तरी ते वेळेत उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा कलाकार श्रीकृष्ण भिंगारे, बाळ तायडे, अण्णा लोंढे, प्रशांत बोगम यांनी व्यक्त केली आहे.
या व्यासपीठाचा उपयोग विविध कलासंस्थांसह वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक संस्था संघटनांना करता येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या परिसरातील नागरिकांना नाट्यगृह सुरू होण्याची उत्कंठा आहे. पालिकेने आता सुरू केलेले काम पूर्ण करावे अन्यथा पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा निर्माते प्रमोद रनवरे, दत्ता दळवी, कलाकार कुणाल देशमुख, देवयानी मोरे, प्रतीक्षा जाधव, स्मिता चव्हाण, वर्षा पाटील, अर्णव काळकुंद्रे यांनी दिला आहे.
असे आहे नाट्यगृह...
व्यासपीठ : ९० बाय ४५ फूट
व्यासपीठासमोर आसन क्षमता : ७५५
बाल्कनीमध्ये आसन क्षमता : १८०
व्यासपीठामागील बाजूस : स्वच्छतागृह, पाच ग्रीन रूम्स, एक कॉन्फरन्स हॉल व व्हीआयपी रूम्स
आम्ही वेळोवेळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असतो. मात्र, त्यासाठी खासगी सभागृह घेताना आर्थिक बाजूंचा विचार करावा लागतो. वानवडीच्या नाट्यगृहात कार्यक्रम घेता येत असले तरी वाहतूक व एकावेळी अनेकांच्या मागणीमुळे मर्यादा येतात. या नाट्यगृहाचा फायदा कलाकार, रसिक, विविध संस्था, संघटना, विद्यार्थ्यांना होईल.
- अविनाश घुले, हरिभाऊ काळे
नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कार्पेट, खुर्च्या, रंग, विद्युतीकरण, गार्डनिंग अशी कामे सध्या सुरू आहेत. दोन महिन्यात ही कामे मार्गी लावून लवकरच नाट्यगृह वापरण्यास सज्ज होईल.
- राजेंद्र तांबे, कार्यकारी अभियंता, महापालिका