PMC Tendernama
पुणे

Pune : रस्ते खोदाई करताना प्रशासनात समन्वयाचा अभाव; ठेकेदारावर काय कारवाई होणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हांडेवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठेकेदाराने (Contractor) खोदल्याने कारवाई करण्यासाठी त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. ठेकेदाराने त्याला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई निश्चित होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या पथ विभागाने हांडेवाडी येथील रस्ता डांबरीकरण केला. त्यानंतर समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठेकेदाराने रस्ता खोदला. त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कोणतीही माहिती नव्हती. रस्ते खोदाई करताना एकीकडे प्रशासनात समन्वय ठेवण्याचा आदेश दिला असताना दुसरीकडे त्याचे पालन होत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले.

हा प्रकार समोर आल्यानंतर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पण त्यापूर्वी नोटीस बजावून खुलासा मागविला आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जगताप यांनी सांगितले.