Katraj Chowk Flyover Tendernama
पुणे

Pune : फक्त सहा महिने थांबा; कात्रज चौकातील कोंडी सुटणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या कात्रज चौकात दररोज होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. कारण या चौकातील महत्त्वाकांक्षी उड्डाण पुलाचे (Katraj Chowk Flyover) काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.

कात्रज चौकातील वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय करण्यासाठी उड्डाण पूल करण्याचे ठरले. त्याचे भूमिपूजन २४ सप्टेंबर २०२१ रोजी झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुलाचे काम सुरू आहे. रानवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाण पुलावरून राजस सोसायटीच्या पुढे जाणार आहे.

चौकातील वाहतूक पुलावरून गेल्यास पीएमपी बसथांबा किंवा कात्रज मंडईच्या आसपास किंवा सातारा रस्त्यावर आणि वंडरसिटीच्या बाजूने लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी होतील. परिणामी, कात्रज व राजस चौकातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पीएमपी बसथांब्यांसाठी जागा झाल्यास प्रवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून हा पूल जात असून, या कामासाठी केंद्र सरकारने १६९ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा पूल सहापदरी असून, त्याची लांबी १ हजार ३२६ मीटर आहे. पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम जलदगतीने करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

असा असेल सहापदरी उड्डाण पूल

१६९ कोटी १५ लाख रुपये - एकूण खर्च

वंडरसिटी सोसायटी ते माउली गार्डन - मार्ग

१३२६ मीटर - एकूण लांबी

२५.२० मीटर - रुंदी

७ मीटर - दोन्ही बाजूंना सेवा रस्ता

सद्यःस्थिती...

२५ फेब्रुवारी २०२२ - पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ

२४ महिने - कामाची मुदत

२४ फेब्रुवारी २०२४ - काम पूर्ण होण्याची तारीख

२० पायांचे काम पूर्ण - एकूण पाया

सहा पूर्ण आणि तीनचे काम प्रगतिपथावर - एकूण २० पिलर कॅप

उड्डाण पुलाचे काम वेगाने आणि वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणत्याही उड्डाण पुलाचे काम करत असताना त्याच्या सुरुवातीच्या कामासाठी जास्त वेळ लागतो. नंतरचे काम गतीने पूर्ण होते. आता पिलरचे काम पूर्ण झाले असून, कात्रज घाटात गर्डरचे काम सुरू आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचे काम वेळेत पूर्ण होईल.

- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्ण झाल्यास चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. परंतु, सध्या चौकातून प्रवास करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण झाल्यास पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- बाळासाहेब थोरात, स्थानिक नागरिक