पुणे (Pune) : महापालिका पाण्याचे मीटर (Water Meter) बसवतेय, ते बसवून घ्या. अन्यथा, नंतर तुम्हालाच अडीच-तीन हजार रुपये भरावे लागतील, अशा शब्दांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे मीटर बसविण्यासाठी ठेकेदाराकडील (Contractor) कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. एकीकडे पाण्याची समस्या सुटत नसताना दुसरीकडे मीटर बसविले जात आहेत. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी समान पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले आहे. महापालिकेने दोन लाख ८८ हजार पाण्याचे मीटर बसविण्याचे निश्चित केले असून त्यापैकी सव्वा लाख मीटर बसविले आहेत. सध्या शहराच्या वेगवेगळ्या परिसरात ठेकेदारांमार्फत मीटर बसविले जात आहेत.
आम्हाला वेळेवर व पुरेसे पाणी मिळत नाही, मग पाण्याचे मीटर कशाला?, पाण्याचे बिल केव्हापासून सुरु होणार?, तुम्ही नक्की महापालिकेचेच कर्मचारी आहात, तर मग तुमच्याकडे ओळखपत्र का नाही?, आम्ही नंतर मीटर बसविले तर चालणार नाही का, असे प्रश्न नागरिकांकडून मीटर बसविणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले जात आहेत. त्यावरुन वादाचे प्रसंग घडत आहेत.
निवासी क्षेत्रांना बिल नाही
निवासी क्षेत्रांना पाणी बिलांची आकारणी केली जाणार नाही. मात्र, व्यावसायिक कारणांसाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांकडून बिल आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
पाणी पुरवठा सुरळीत करताना पाण्याचा अपव्यय होऊ नये, गळती थांबावी, हे पाणी मीटर बसविण्याचे मुख्य कारण आहे. ठेकेदारांच्या कामगारांकडून कोणालाही जबरदस्ती केली जात नाही. असे प्रकार घडत असतील, तर आमच्याकडे तक्रार करावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका
मीटर बसविण्यासाठी आलेल्या व्यक्तीने आम्हाला ‘मीटर बसवा, नाहीतर फटका बसेल’, असे सांगितले. संबंधित कर्मचारी महापालिकेचा असल्याचा त्याच्याकडे पुरावा नव्हता. त्याने काही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
- एक नागरिक