pune Tendernama
पुणे

Pune : आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत लगीन घाई; 400 कोटींच्या...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (PMC) : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी ४०० कोटी रुपयांच्या २२० हून अधिक विविध कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये उद्यान, पथ, पाणीपुरवठ्यासह अन्य विभाग आणि समाविष्ट गावांमधील विविध विकासकामांचा समावेश आहे.

हरियाना, जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणाही लवकरच होण्याची शक्‍यता आहे. आचारसंहितेमध्ये विकासकामांना तांत्रिकदृष्ट्या अडचण येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत ९० कोटींच्या १६० प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही प्रशासनाने स्थायी समितीची बैठक घेत अधिकाधिक प्रस्तावांना मान्यता देण्याचा झपाटा सुरूच ठेवला.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी स्थायी समितीची बैठक झाली. ही बैठक सुरू होईपर्यंत विविध कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी येत होते. कार्यपत्रिकेवर २२० हुन अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले होते. या व्यतिरिक्त ऐनवेळी काही प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आले.