Railway Station Tendernama
पुणे

Pune : उत्पन्न वाढविण्याच्या नादात रेल्वेचे प्रवाशांकडे दुर्लक्ष होतेय का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी पुण्यासह मुंबई, सोलापूरहून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. यातील बहुतांश रेल्वे गाड्या मनमाड-भुसावळ मार्गावर धावत आहेत. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या आधीपासून जास्त आहे. त्यात दिवाळी विशेष गाड्यांची भर पडली. या सर्वांचा परिणाम वेळापत्रकावर झाला आहे. परिणामी गाड्यांना उशीर होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.

पुण्याहून सुटणाऱ्या व पुण्यात दाखल होणाऱ्या गाड्यांना निर्धारित वेळेपेक्षा तब्बल पाच ते सहा तासांचा उशीर होत आहे. मनमाड भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. या विभागात क्षमतेपेक्षा जास्त गाड्या मार्गावर आल्याने अनेक गाड्यांना 'पाथ' (मार्ग) वेळेवर उपलब्ध होत नाही. परिणामी या गाड्या वेगवेगळ्या विभागात थांबवून ठेवण्यात येत आहेत. परिणामी गाड्यांना उशीर होत आहे.

रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडून उत्पन्नात वाढ तर केली. वेळापत्रकासाठी आवश्यक असलेले नियोजन मात्र चुकले. मागच्या काही दिवसांत पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसला आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाला.

या गाड्या ‘लेट’

- पुणे - अमरावती स्पेशल : ५ तास १० मिनिटे

- पुणे - दानापूर सुपरफास्ट स्पेशल : ९ तास ५० मिनिटे

- जम्मू तावी - पुणे झेलम एक्स्प्रेस : १ तास

- अमरावती - पुणे व्हाया लातूर रोड : १ तास ४६ मिनीटे

- पुणे - सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस : १ तास ५० मिनिटे

भुसावळ - मनमाड विभागात गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे.

- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई