पुणे (Pune) : कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना दिवाळीत रेल्वेने प्रवास करणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण पुण्याहून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना ‘रिग्रेट’ सुरू झाले आहे.
काही गाड्यांचे वेटिंग ४००च्या वर गेले आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना रिग्रेट आहे तर दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांना वेटिंग आहे. यासह पुण्याहून सोलापूर, कोल्हापूर, अहमदाबादला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना देखील मोठ्या प्रमाणात वेटिंग सुरू आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म नसेल तर तो प्रवास प्रवाशांना खडतर ठरणार आहे.
दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याआधीच जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. पुण्याहून ७०हून अधिक जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
या गाड्यांना आहे रिग्रेट :
आझाद हिंद एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे - दानापूर एक्स्प्रेस, चंडीगड संपर्कक्रांती एक्स्प्रेस, पुणे- जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, गांधीधाम एक्स्प्रेस, पुणे - भगत की कोठी एक्स्प्रेस,पुणे - राजकोट एक्स्प्रेस यासह अन्य काही लांबपल्याच्या गाड्यांना देखील ‘रिग्रेट’ सुरू झाले आहे.
या गाड्यांना आहे वेटिंग :
पुणे - सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे -नागपूर एक्स्प्रेस, पुणे - दानापूर विशेष एक्स्प्रेस, पुणे - मालदा टाऊन एक्स्प्रेस, पुणे - मडगाव गोवा एक्स्प्रेस, कुर्ला- चेन्नई एक्स्प्रेस, सीएसएमटी- चेन्नई एक्स्प्रेस, मुंबई - बंगळूरू उद्यान एक्स्प्रेस आदींना वेटिंग आहे. यात सर्वाधिक वेटिंग पुणे - नागपूर एक्स्प्रेसला आहे. या गाडीला स्लिपर कोचचे वेटिंग ४००हून अधिक आहे.