restaurant on wheels Tendernama
पुणे

Pune: रेल्वेच्या डब्यात बसून जेवण करायचेय, मग ही बातमी वाचाच...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवाशांना रेल्वेच्या डब्यात बसून लज्जतदार पदार्थाची चव चाखता यावी म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ या संकल्पनेवर आधारित देशातील प्रमुख स्थानकावर खास रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुणे स्थानकावर (Pune Railway Station) देखील असे रेस्टॉरंट उभारण्यात येणार आहे. त्याची टेंडर (Tender) प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.

पुणे स्थानकाच्या पाठीमागच्या पार्किंग जवळच्या जागेत यासाठी एक रेल्वे डबा ठेवण्यात आला आहे. त्याची अंतर्गत रचना बदलून त्यात हॉटेल थाटले जाईल. हे २४ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

दिवसेंदिवस या हॉटेलची वाढती प्रसिद्धी पाहता रेल्वे प्रशासनाने आणखी चार ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पुणे विभागातील पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील चिंचवड रेल्वे स्थानकावर डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आले. आता पुणे विभागातील दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील उभारण्याचे काम पुणे स्थानकाच्या पाठीमागील बाजूस सुरू आहे. डब्यात आवश्यक तो बदल करून दोन महिन्याच्या आतच हे रेस्टॉरंट प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. रेल्वे प्रवाशांव्यतिरिक्त देखील अन्य नागरिकांसाठी हे रेस्टॉरंट खुले असणार आहे.

पहिले रेस्टॉरंट कुठे?

या संकल्पनेअंतर्गत भारतातातील पहिले रेस्टॉरंट मडगाव स्थानकावर सुरु झाले, त्यानंतर पश्‍चिम बंगालच्या असनसोल रेल्वे स्थानकावर २६ फेब्रुवारी २०२० रोजी दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू झाले. याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि नागपूर येथे रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू केले. या दोन्ही ठिकाणी एक लाख ५० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी जेवणाचा लाभ घेतला आहे.

अशी आहे योजना...

- आयुर्मान संपलेल्या रेल्वेच्या जुन्या डब्याचा वापर यासाठी केला जातो.

- यातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळते.

- रेल्वे प्रशासनाने रेस्टॉरंट ऑन व्हीलची ही नवीन संकल्पना २०२० मध्ये राबवली.

- २४ मीटर लांबीच्या रेल्वेच्या डब्यात आकर्षक डेकोरेशन करून हॉटेल तयार केले जाते.

- यामध्ये नागरिकांना जेवण, नाष्टा आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

- ही सेवा २४ तास सुरु राहणार आहे.

- प्रवाशांना कधीही याचा लाभ घेता येतो.

रेस्टॉरंटसाठी आवश्यक असणारा डबा मिळाला असून तो पार्किंग जवळच्या जागेत ठेवला आहे. संबंधित ठेकेदारास आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांना रेल्वेत जेवण करत असल्याचा अनुभव या रेस्टॉरंटमध्ये करताना येईल. दोन महिन्यांच्या आतच ही सेवा सुरू होईल.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे