पुणे (Pune) : महापालिकेत (PMC) कायम करून घेतील म्हणून मी बारा वर्षे झाली कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते आहे. पण आमची ही इच्छा कधी पूर्ण होईल असे वाटत नाही. ना पुरेसा पगार, ना सेवासुविधा, ना सन्मान. आशेवर किती दिवस रहायचे? आम्हाला कोण न्याय देईल, अशी निराशाजनक भावना महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार महिलेने व्यक्त केली. तिच्या या मागणीला सहमती दर्शवत इतर कामगारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र लक्षात घेता ३२० सफाई कामगारांची गरज असताना साधारण २८० कामगार सध्या कार्यरत आहेत. ठेकेदार सतत बदलत असल्याने वेळेवर पगार न मिळणे, भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा न होणे, आरोग्य लाभापासून (ईएसआय) वंचित राहणे याबाबत कामगारांच्या तक्रारी आहेत.
एक कामगार म्हणाला की, जो तक्रार करतो त्याला घरी बसवतात. पूर्वी आम्हाला महिन्यातून २६ दिवस काम मिळायचे आता ते २२ दिवसांवर आले आहे. आम्हाला आरोग्य सुरक्षा म्हणून साबण, सॅनिटायझर, गमबूट, मास्क यासारख्या ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या मिळतच नाहीत.
एक महिला म्हणाली, आता आम्हाला महिन्याला साधारण तेरा हजार पगार मिळतो. पण त्यात भागत नाही. मुलीची शाळेची फी भरायची आहे. पण अजून पगार झालेला नाही. मुलीला कसे शिक्षण देणार मी. मनपाकडून डायरेक्ट पगार जमा होणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. परंतु, आपल्याकडे अजूनही ते ठेकेदाराकडून होतात.
आज कामगारांच्या खात्यावर पगार जमा झाला आहे. तो लवकर व्हायला पाहिजे या कामगारांच्या मागणीशी मी सहमत आहे. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाने सफाई कामगारांच्या सोयीसाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे. १२० कामगारांना ईएसआय कार्डचे वाटप करण्यात आले आहे. ज्यांची कागदपत्रे अपुरी आहेत, आधारकार्ड अपडेट नाहीत त्यांना प्रॉब्लेम येतो. त्यांना कागदपत्रे अपडेट करायला सांगितले आहे. पीएफ जमा झाला आहे. कामगारांनी नीट माहिती घेणे आवश्यक आहे. जर कामगारांची अडचण असेल तर त्यांनी कक्षात भेटून ती दूर करून घ्यावी.
- राम सोनवणे, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय