पुणे (Pune) : मिळकतकर थकविणाऱ्या नागरिकांच्या इमारतीसमोर बँड वाजवून थकबाकी वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून (ता. २६) शहरात पाच पथकांच्या माध्यमातून बँड वाजवून थकबाकी वसूल केली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या खर्चाचा डोलारा वाढत असताना त्याप्रमाणे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान देखील प्रशासनावर आहे. यामध्ये मिळकतकर विभागावर उत्पन्न वाढविण्याची प्रमुख जबाबदारी आहे.
महापालिकेने 2023 -24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात 2300 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिलेले आहे. आत्तापर्यंत 1900 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिना शिल्लक असताना प्रशासनाला आणखी 400 कोटी रुपये वसूल करणेचे आव्हान आहे. दरम्यान हे उद्दिष्ट पूर्ण होणार नसले तरी किमान 2100 कोटी रुपयांपर्यंत कर जमा करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मिळकत कराची वसुली करण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिकेने नुकतीच खराडी भागांमध्ये जोरदार कारवाई केली. यामध्ये सहा मिळकती सील करण्यात आल्या त्यानंतर संबंधित मिळकत धारकांनी सहा कोटी रुपयांचे धनादेश प्रशासनाला दिलेले आहेत.
महापालिकेत मिळकत कर विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये थकबाकी न भरणाऱ्या मिळकती, मिळकतकर लावून न घेणाऱ्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे थकित मिळकतकर भरण्याचे प्रमाण वाढवे यासाठी थकबाकीदाराच्या इमारतीसमोर बँड वाजवला जाणार आहे. त्यामुळे ही नामुष्की टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांची थकबाकी त्वरित भरून घ्यावी यासाठी प्रयत्न करावेत असे बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत.
मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, मिळकतकर विभागाने आज सहा मिळकती सील करून सहा कोटी रुपयांची चेक द्वारे वसुली केलेली आहे. आज झालेल्या बैठकीत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांच्या इमारतीसमोर बँड वाजून थकबाकी वसूल केले जाणार आहे. याची सुरुवात सोमवार पासून केली जाईल.