पुणे

Pune : टेंडरची मुदत संपण्यापूर्वीच जलपर्णी सुकते कशी? कंत्राटदार नेमके करतोय काय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जांभूळवाडी तलावातील (Jambhulwadi Lake) एक ते दीड टन मासे मृत झाल्याची घटना नुकतीच घडली. गेल्या तीन वर्षांतील ही तिसरी घटना असून, त्यामुळे तलावाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले.

अगोदरच तलावात जात असलेले सांडपाणी आणि त्यात माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तलावातील जलपर्णीतच मासे सडून गेल्याचे दृश्य समोर आले आहे. महापालिकेकडून काढण्यात आलेल्या जलपर्णीच्या ढिगाऱ्याखाली मासे गाडले गेले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

जलपर्णी काढण्याचे कंत्राट (Tender) मार्चअखेर संपणार आहे. त्यात गतवर्षीचा विचार करता मार्च महिना जवळ येताच जलपर्णी सुकते आणि कंत्राटदाराकडून (Contractor) तलाव स्वच्छ केल्याचा दावा केला जातो आहे आणि टेंडरचे पूर्ण बिल पास करून घेतले जाते.

दरम्यान, टेंडरची मुदत संपण्यापूर्वीच जलपर्णी कशी काय सुकते, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. जलपर्णीवर रासायनिक फवारणी केल्याने ती सुकून तिची वाढ होणे थांबत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे.

तलाव परिसरात वाढलेल्या नागरीवस्तीतील सांडपाणी दिवसाढवळ्या तलावात सोडले जाते आहे. शिवाय परिसरात असलेल्या विविध कंपन्या आणि सिमेंट प्लांटमधील रसायनमिश्रित सांडपाणी थेट तलावात सोडले जाते आहे. याबाबत पाटबंधारे विभाग आणि महापालिकेची उदासीनता दिसून येत आहे. नुकतीच महापालिकेकडून तलावाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली असली तरी तलावात सोडल्या जात असलेल्या दूषित पाण्याची सोय महापालिकेकडून अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे तलावातील पाण्यावर तवंग दिसून येत असून, तलावाचे पाणी काळेशार झाले आहे. पाण्यातून दुर्गंधीयुक्त वासही येतो आहे.

नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला जांभूळवाडी तलाव नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. दरम्यान, तलावाचे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे देखभालीसाठी हस्तांतर झाले असले तरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पाटबंधारे विभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवतात. अशा धोरणामुळे तलाव मात्र दुर्लक्षित राहिल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. गेली सलग दोन वर्षे तलावात मासे मरण्याच्या घटना घडत आहेत. त्यानंतर आज या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

पाण्यावर रासायनिक फवारणी

तलावातील जलपर्णी काढण्याचे कंत्राट महापालिकेकडून देण्यात आले आहे. जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी किंवा ती नष्ट होण्यासाठी कंत्राटदाराकडून रासायनिक फवारणी केली जाते. त्याचा परिणाम जलचरांवर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा स्थानिक करत आहेत. मागील वर्षी कंत्राटदाराने हा फवारणीचा प्रयोग केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. कंत्रादारांच्या अशा भूमिकेमुळे विषबाधा होऊन मासे मेल्याची शक्यता स्थानिक वर्तवत आहेत.

काढलेल्या जलपर्णीचे सांडव्यातच ढिगारे

ठेकेदाराने तलावातील जलपर्णी काढली असली तरी त्याचे ढिगारे तलावाच्या सांडव्यात ठेवले आहेत. पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास सांडव्यातून विसर्ग होण्यास अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जाते आहे.

जांभूळवाडी तलावासाठी मुख्यवाहिनी टाकून झाली आहे. शिवाय नव्वद टक्के सांडपाण्याचे स्रोतदेखील मिळाले आहेत. चारपैकी तीन वाहिन्या जोडल्या गेल्या आहेत. उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण होईल.

- सिद्धराम पाटील, कनिष्ठ अभियंता मलनिस्सारण, महापालिका