MSEB, Mahavitaran Tendernama
पुणे

Pune : 41 हजार वीज ग्राहकांचे मासिक वीजबिल कसे झाले शून्य? कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांचे मासिक वीजबिल शून्य झाले आहे. तर नऊ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.

घराच्या छतावर एक ते तीन किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणकडून १० किलोवॉटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. तसेच सौर नेटमीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात येत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॉटपर्यंत प्रति किलोवॉट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्यासाठी घरगुती व गृहसंकुल ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

आकडे बोलतात

पश्चिम महाराष्ट्रामध्ये या योजनेत सहभागासाठी आतापर्यंत प्राप्त ४१ हजार ११५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर नऊ हजार ८०८ ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. मंजूर अर्ज (कंसात- कार्यान्वित प्रकल्प) पुणे जिल्हा- १८ हजार २४५ (३७९८), सातारा जिल्हा- ४ हजार २५२ (९७३), सोलापूर जिल्हा- ६ हजार ३४१ (१६०३), कोल्हापूर जिल्हा- ७ हजार ३२८ (२४७५) आणि सांगली जिल्ह्यात ४ हजार ९५९ अर्ज मंजूर झाले असून ९५९ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सद्यःस्थितीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये छतावरील आणखी ३६८२ सौर प्रकल्पांचे काम सुरू आहे.

३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी ही योजना उपयुक्त आहे. तसेच सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती व गृहसंकुलांनी सहभागी व्हावे.

- भुजंग खंदारे, पुणे प्रादेशिक संचालक, महावितरण