पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) शहरातील नाले, पावसाळी गटारांची सफाई केली असली तरीही पूर्वानुभव पाहता रस्त्यावर पाणी तुंबणे, वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे प्रकार दरवर्षी घडत आहेत. त्यामुळे अशी परस्थिती निर्माण होताच क्षेत्रीय कार्यालयांनी संबंधित भागात यंत्रणा कामाला लावून पाण्याचा निचरा करावा, यासाठी पथक नियुक्त केले आहेत. तर रहिवासी भागात पाणी शिरल्यास तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ४७ मदत केंद्रांची व्यवस्था केली आहे.
पुणे महापालिकेने पावसाळापूर्वी तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालयाच्या उपायुक्तांसोबत बैठक घेण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते येथे पाणी तुंबू नये यासाठी दरवर्षी उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो.
पावसाळी गटार आणि नाले सफाईसाठी महापालिका दरवर्षी किमान २० कोटी खर्च होतात. तरीही पावसाळ्यात नेक भागात पाणी तुंबते, गटारातून पाणी वाहून जाण्याची क्षमता संपल्याचे अनुभव येत आहेत.
समन्वय नसल्याने टाळाटाळ
शहरात पाणी तुंबल्यानंतर तेथे काम कोणी करायचे यावरून मलःविसारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे कामे करण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या परिपत्रकात क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन उभारून अधिकारी, कर्मचारी आणि नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी.
नाल्यांची साफसफाई मुख्य खात्याकडून करण्यात आली असून, मुख्य खात्याच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढविल्यास मदत कार्य करण्यासाठी पथक तयार ठेवावेत. अग्निशामक दलाने क्षेत्रीय कार्यालयांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे, असे आदेश दिले आहेत.
तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १ जून ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी पूर नियंत्रण कक्ष स्थापन करावा, असेही नमूद केले आहे.
क्षेत्रीय कार्यालय आणि मदत केंद्र...
- नगर रस्ता- वडगाव शेरी - १ ते २, येरवडा-कळस-धानोरी - ३ ते ६, ढोले पाटील रस्ता - ७ ते १०, औंध- बाणेर - ११ ते १४, कोथरूड-बावधन- १५ ते १९, शिवाजीगर-घोले रस्ता -२० ते २८, सहकारनर धनकवडी - २९, सिंहगड रस्ता - ३१ ते ३३, वारजे कर्वेनगर- ३४ ते ३५, हडपसर मुंढवा ३६, वानवडी रामटेकडी - ३७, कोंढवा येवलेवाडी ३८ ते ३९, कसबा विश्रामबाग -४० ते ४४, भवानी पेठ- ४५, बिबवेवाडी - ४६ ते ४७