Housing Tendernama
पुणे

Pune : वर्षाच्या सुरवातीलाच बांधकाम सेक्टरसाठी गुड न्यूज!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : यंदाच्या वर्षातील पहिलाच महिना बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या उलाढालीचा ठरला. जानेवारी २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यात सात हजार ७३६ कोटींचे मूल्य असलेल्या १२ हजार १६६ मालमत्तांचे व्यवहार झाले. त्यातून राज्याच्या महसुलात ४४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षाचा विचार करता यात ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मालमत्ता व्यवहारांमध्ये घरांच्या व्यवहारांचा वाटा सर्वाधिक आहे. नोंदणीकृत मालमत्तांपैकी प्राथमिक आणि दुय्यम निवासी सौद्यांचा वाटा ७३ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील निवासी मालमत्तेसाठी गृहखरेदीदारांकडून ५००-८०० चौरस फुटांच्या घरांना पसंती मिळाली आहे. तर २५ ते ५० लाख रुपयाच्या किमतीच्या घरांची सर्वाधिक खरेदी झाली आहे.

या घरांना मागणी

५००-८०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांच्या मागणीचा हिस्सा जानेवारी २०२३ मध्ये जवळपास अर्धा आहे. मात्र, हा वाटा जानेवारी २०२२ च्या तुलनेत ५० वरून जानेवारी २०२३ मध्ये ४८ टक्क्यांपर्यंत घसरला. ५०० चौरस फूट घरांचा वाटा यंदाच्या व्यवहारांत २७ टक्के आहे. तर ८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांचा हिस्सा गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदा २२ वरून २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

पुण्यात ८० टक्के व्यवहार
मध्य पुणे, हवेली तालुका, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा समावेश असलेल्या निवासी व्यवहारातील सर्वात मोठा वाटा पुणे शहराचा आहे. जानेवारी २०२२ मध्ये ७९ वरून जानेवारी २०२३ मध्ये हा वाटा ८० टक्क्यांवर पोचला आहे. त्यानंतर पश्चिम पुण्याचा नंबर लागतो. ज्यात मावळ, मुळशी, वेल्हे आणि परिसराचा समावेश आहे.

मुद्रांक वाढल्याची कारणे
- घर खरेदीच्या व्यवहारांत झालेली वाढ
- रिझर्व्ह बँकेने वर्षभरात अनेकदा रेपो दरात केलेली वाढ
- गहाण दरात झालेली वाढ

पुण्यातील निवासी बांधकाम क्षेत्र हे अंतिम वापरकर्त्यांवर आधारित आहे. अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बाजाराने गृहखरेदीबाबत कमालीची लवचिकता दर्शविली आहे. रेपो रेटमध्ये सलग वाढ, मेट्रो सेसची अंमलबजावणी आणि कोणतेही सरकारी प्रोत्साहन नसतानाही जानेवारीत घरखरेदी आकर्षक राहिली आहे. घर घेणे परवडण्याच्या क्षमतेला दिलेला पाठिंबा, मजबूत रोजगाराच्या शक्यता आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा हे शहरात घर खरेदीदारांचे स्वारस्य टिकवून ठेवतील.
- शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया