पुणे (Pune) : महापालिकेने दैनंदिन कामकाज ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारप्रमाणे महापालिकेच्या सेवेत ‘इ - ऑफिस’ या प्रणालीचा वापर करणे सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १६ विभागात फाइल बनविणे, टेंडर (Tender) काढणे यासह इतर कामे या माध्यमातून सुरू आहेत. उर्वरित ४४ विभागात पुढील दोन महिन्यांत ही प्रणाली कार्यान्वित होऊन, महापालिकेचा कारभार १०० टक्के ऑनलाइन केला जाईल.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी नवीन वर्षात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये महापालिकेचा कारभार वर्षभरात डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेत क्षेत्रीय कार्यालयासह ६० विभाग आहेत. त्यापैकी १६ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ‘इ - ऑफिस’ प्रणाली वापरात आणली आहे. त्यामध्ये नव्या फाइल या प्रणालीमध्ये तयार करणे, त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्णय करून घेणे, काम करून प्रकरणाचा निपटारा करणे ही सर्व कामे याच माध्यमातून सुरू झाली आहेत, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.
हे प्रकार टळणार
- प्रस्तावाची प्रिंट काढून फाइल तयार करणे
- एका विभागातून दुसऱ्या विभागात फाइल पाठविणे
- कागद हाताळताना फाटणे, हरविणे हे प्रकार टळतील
- कोणाकडे फाइल प्रलंबित आहे, कधीपासून आहे हे समजणार
- विनाकारण कामाला विलंब करता येणार नाही
हे होणार
- अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५० लॉगइन आयडी तयार
- ऑनलाइन फाइल संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याकडे पाठविता येणार
- हळूहळू झेरॉक्स, प्रिंटर याचा वापर कमी, कागदाची बचत
- अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू
१०० जागांसाठी जाहिरात
महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १०० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी सोमवारी (ता. ८) जाहिरात काढली जाईल. या भरतीमध्ये अनुभवाची अट नसल्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली होती, त्यातील न्यायालयात याचिका दाखल केलेले उमेदवार वगळता इतर उमेदवारांची प्रतीक्षा यादीची मुदत संपली आहे, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.