PMC Pune Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिकेच्या 13 कोटींच्या 'त्या' 22 टेंडरसाठी कंत्राटदारांनी 'रिंग' केलीय का?

Pune : संशयाच्या फेऱ्यात २२ टेंडर: कंत्राटदारांची सांगड घालून Tender भरण्याचा प्रकार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेचे (PMC) आर्थिक वर्ष संपत आलेले असताना सांडपाणी व्यवस्थापन विभागाकडून सांडपाणी वाहिनी बदलणे, दुरुस्त करण्याच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. एकाच वेळी सुमारे १३ कोटी रुपयांच्या २२ टेंडर स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवल्या असून, त्यामध्ये ठेकेदारांनी ठरवून कामे भरल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने आम्ही खुल्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविल्या असून 'रिंग' झाली नसल्याचा दावा केला आहे.

ही कामे अत्यावश्‍यक असल्याने अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर त्याच्या त्वरित टेंडर निघणे आवश्‍यक आहे. पण, सांडपाणी व्यवस्थापन विभागाने आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एकाच वेळी २२ टेंडर काढून सुमारे १३ कोटी रुपये खर्ची पाडण्याचे नियोजन केले आहे. या टेंडर काढताना यामध्ये ठेकेदारांनी एकमेकांशी संगनमत करून कामे वाटून घेतली आहेत. त्यानुसार टेंडर भरल्या आहेत. त्यामुळे २२ पैकी १५ टेंडर या एकसारख्या म्हणजे ४ टक्के कमी दराने आलेल्या आहेत.

अशी कामे सुचविली

पुणे महापालिकेच्या २०२३-२४च्या अर्थसंकल्पात नाना पेठ मच्छी मार्केट, वडगाव पूल, महंमदवाडी, प्रेमनगर, रामटेकडी, राजेवाडी, अमजाद खान चौक ते राणा प्रताप रस्ता, सदाशिव पेठ, भैरोबा नाला, आईमाता मंदिर परिसर, फडके हौद परिसर, के. के. मार्केट, पापळ वस्ती यासह शहराच्या इतर भागातील सांडपाणी वाहिन्या बदलणे, नवीन वाहिनी टाकणे, चेंबर बदलणे, दुरुस्त करणे, अशी कामे सुचविली आहेत.

एकाच वेळी टेंडर काढून कामांचे वाटप

सांडपाणी व्यवस्थापन विभागाच्या टेंडरमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो. ठराविक ठेकेदाराला टेंडर मिळवून देण्यासाठी काही माजी नगरसेवकांसह आमदारांचा कायम अधिकाऱ्यांवर दबाव असतो. यापूर्वी टेंडर मिळविण्यातून वाद झाल्याने ठेकेदारांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केल्याने कामे मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण, आता ठेकेदारांमध्ये भांडणे होऊ नयेत, टेंडर वादात सापडू नये, यासाठी एकाच वेळी टेंडर काढून कामांचे वाटप केल्याची चर्चा महापालिकेत आहे.

महापालिका प्रशासनाने खुली टेंडर प्रक्रिया राबविला आहे. यामध्ये कोणीही टेंडर भरू शकत होते. या कामात कुठेही ठरवून एखाद्या ठेकेदाराला काम दिलेले नाही. ही प्रक्रिया योग्य आहे.

- संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता