पुणे (Pune) : महापालिकेवर (PMC) प्रशासक राजवट आल्यापासून क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत. त्याचा परिणाम थेट महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयावर झाला आहे. छोट्या प्रश्नांसाठीही नागरिक आयुक्तांकडे येत असल्याने गर्दी वाढली आहे.
त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांच्या निष्क्रियतेवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बोट ठेवत कामात सुधारणा करण्याचा आदेश दिला आहे. प्रश्न सोडविण्यासाठी परिमंडळ उपायुक्तांनी दर महिन्याला सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्याचा आदेश दिला आहे.
पुणे महापालिकेची शहरात १५ क्षेत्रीय कार्यालये आणि पाच परिमंडळ उपायुक्त कार्यालये आहेत. प्रभागातील आरोग्य, रस्ता, पाणी, कचरा यासह अन्य किरकोळ प्रश्न, समस्यांचा निपटारा या स्तरावरच होणे आवश्यक आहे.
पण महापालिकेचा मुख्य विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने प्रश्न सुटत नाहीत. ही कामे मार्गी लागत नसल्याने नागरिक महापालिका भवनात येत आहेत.
यासाठी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी परिपत्रक काढले आहे. स्थानिक समस्या, प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिमंडळाच्या उपायुक्तांनी प्रत्येक महिन्याला क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची सद्यःस्थिती, मुख्य खात्याशी समन्वय ठेवून केलेली कामे याचा अहवाल तयार करून महापालिका आयुक्तांना सादर करावा, असे आदेशात नमूद केले आहे.
ही कामे करणे आवश्यक...
१. क्षेत्रीय कार्यालय व मुख्य खात्यामध्ये समन्वय असावा
२. सांडपाणी व्यवस्थापन, पादचारी मार्गाची कामे करावीत
३. पथदिवे व पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सोडवाव्यात
४. साथरोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती करावी
५. घनकचराबाबतच्या तक्रारी त्वरित सोडवाव्यात
६. केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
७. उपायुक्तांनी घेतलेल्या बैठकीचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांकडे दरमहा सादर करावा