PMC Pune Tendernama
पुणे

PMC News : महापालिका आयुक्तांच्या आदेशालाच प्रशासनाने तिलांजली दिलीय का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावताना रस्ते, पादचारी मार्ग अडवू नयेत, महापालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये व्यवस्था करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले होते. पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परवानगी न घेता पुणे शहरात रस्त्यांवर, पादचारी मार्गांवर स्टॉल उभारणीचे काम सुरू झाले आहे. अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या आशीर्वादाने रस्ते, पादचारी मार्ग अडविले जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत आहे.

सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी आवडीची गणेश मूर्ती घेण्यासाठी नागरिकांकडून बुकिंगसाठी गर्दी केली जाते. त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन-तीन आठवडे आधीपासूनच शहरात गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लागण्यास सुरवात होते. पूर्वी मूर्ती विक्रेत्यांची संख्या मर्यादित होती, पण गेल्या काही वर्षांत मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्याचे प्रमाण वाढले आहे.

पादचारी मार्गांवर पत्र्याचे शेड टाकून स्टॉल थाटले जात आहेत. गणेशोत्सवाला आणखी काही दिवसांचा अवधी असला तरी मोक्याची जागा मिळावी, यासाठी आतापासूनच महत्त्वाचे चौक, रस्ते मूर्ती विक्रेत्यांनी ताब्यात घेऊन स्टॉल उभारणी सुरू केली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेत नुकतीच बैठक आयोजित केली होती. त्यावेळी नागरिकांनी मूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी मोठ्या प्रमाणात जागा व्यापली जाते. पादचारी मार्ग, रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी रस्ते, पादचारी मार्गांऐवजी महापालिकेच्या जागांमध्ये स्टॉल उभारणीसाठी जागा निश्‍चित कराव्यात, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. पण आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

अतिक्रमण विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना स्टॉलवर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात शहरात सर्वत्र स्टॉल उभारणी जोरात सुरू आहे.

रस्ते, पादचारी मार्ग अडवून गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावणे योग्य नाही. त्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा स्टॉलवर कारवाई करा याचे तोंडी आदेश क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

- सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका