Pune City Tendernama
पुणे

Pune: 'हा' घ्या स्वस्तात पुण्याचे पर्यटन करण्याचा मस्त पर्याय!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीएमपी (PMPML) प्रशासनाने प्रवाशांना कमी दरात पर्यटनाचा आनंद घेता यावा म्हणून पर्यटन बस सेवा सुरू केली. सातपैकी बससेवा क्रमांक २च्या सेवेचे उद्‍घाटन रविवारी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे झाले.

सह व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. पहिल्या दिवशी २६ प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला.

हडपसर गाडीतळ येथे रविवारी सकाळी ९ वाजता या सेवेचे उद्‍घाटन झाले. ही ई-बस असून, संपूर्ण वातानुकूलित आहे. हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर असे याचे मार्ग असून हडपसर गाडीतळ येथे प्रवास संपेल. ही बस सेवा दर शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहे.

या वेळी पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी अल्ताफ सय्यद, महामंडळाचे अधिकारी विजय रांजणे, शैलेश जगताप, मोहन दडस, समीर अत्तार, सुरेंद्र दांगट व कर्मचारी उपस्थित होते.

या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीट दर रुपये ५०० इतका आहे. पीएमपीने सुरू केलेल्या वातानुकूलित पर्यटन बससेवेचा लाभ भाविक व पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.