Railway Track Tendernama
पुणे

Pune : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील 'या' रेल्वे उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुरंदर तालुक्यातील जेजुरी-नीरा महामार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय NHAI) यास मंजुरी दिली असून बत्तीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील केली आहे. मागील वीस वर्षांपासूनच्या नीरा-वाल्हे परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा गावानजीक पिसुर्टी येथे रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या उड्डाणपुलाची मागणी वर्षानुवर्षे केली जात होती. आतापर्यंत पुणे-पंढरपूर महामार्ग नीरा गावातून जात होता. त्यामुळे महामार्ग रुंदीकरण मोहिमेत पिसुर्टी रेल्वेगेटवर उड्डाणपूल होईल अशी लोकांना आशा होती. मात्र हा महामार्ग पिसुर्टीतून बाह्यवळणाद्वारे नीरा गाव वगळून थेट लोणंदच्या दिशेने उभारला जात आहे. परिणामी पिसुर्टी-नीरा रस्तासुद्धा आहे तसाच अरुंद राहिला होता आणि पिसुर्टीच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे स्वप्न तसेच राहिले.

प्रत्येक रेल्वे आली की पंधरा-वीस मिनिटे तिष्ठत रहायचे आणि वाहतूक कोंडी सोडवत बसायचे याला वैतागलेल्या पिंपरे खुर्द, नीरा, जेऊर, मांडकी, वाल्हे, गुळुंचे या गावच्या ग्रामस्थांनी उड्डाणपुलासाठी तसेच पिसुर्टी-नीरा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आक्रमक भूमिका स्वीकारली होती.

यानंतर सुरवातीला रस्ता रुंदीकरण झाले आणि आता एनएचएआयने बत्तीस कोटींच्या उड्डाणपुलास मंजुरी दिली. लवकरच त्याचे टेंडर निघून कामाला सुरवात होईल, अशी माहिती पाठपुरावा करणारे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी दिली.

दरम्यान, महामार्गासाठी खोदाई झाल्याने शिंदेवस्ती गावचा रस्ता बंद झाला होता. त्यांनाही सर्विस रोड काढून देण्याचा शब्द महामार्ग प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे झेंडे व एनएचएआयचे अधिकारी फारुख सय्यद यांचा पिंपरे खुर्द येथे नीरा पंचक्रोशीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, सोमेश्वरचे माजी संचालक दिलीप थोपटे, विजय थोपटे आदींच्या हस्ते सत्कार केला. याप्रसंगी टी. के. जगताप, महेश जेधे, बी. टी. गायकवाड, विलास थोपटे, राजेंद्र थोपटे, विठ्ठल गायकवाड, संजय थोपटे, रोहिदास थोपटे उपस्थित होते.

सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक दिलीप थोपटे म्हणाले की, नीरा-वाल्हे पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलने केल्याने रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल व शिंदेवस्तीचा रस्ता ही गुंतागुंतीची कामे होऊ शकली.