Indian Railway Tendernama
पुणे

Pune : Good News! लवकरच खडकी स्थानकावरून सुटणार नव्या रेल्वे गाड्या; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हडपसर टर्मिनलनंतर आता रेल्वे प्रशासन खडकी स्थानकाचा विकास करणार आहे. खडकी स्थानकावर रेल्वेचे नवे कोचिंग टर्मिनल होत आहे. पुणे विभागाने त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला. येत्या अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळण्याची आशा आहे. फलाटांची लांबी व उंची वाढविण्यासह पादचारी पुलाचे विस्तारीकरण करणे आदी विविध कामे केली जाणार आहे. खडकी टर्मिनल झाल्यावर पुण्याहून सुटणाऱ्या काही रेल्वे खडकी स्थानकावरून सुटतील. परिणामी, पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. हडपसर टर्मिनल करताना सुमारे ९८ कोटी रुपयांचा खर्च आला. आता खडकी टर्मिनल करताना प्रवासी सुविधा तर वाढतीलच, शिवाय वाहतुकीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. फलाटांच्या संख्येतही वाढ होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा रेल्वे खडकी स्थानकावरून सुटतील. येत्या दोन ते तीन वर्षांत हे टर्मिनल उभे राहणार आहे. पुणे स्थानकाजवळील हे दुसरे टर्मिनल तर विभागातील तिसरे टर्मिनल म्हणून ओळखले जाईल.

असे असणार टर्मिनल...

१) खडकी स्थानकावर सध्या चार फलाट आहेत. त्यापैकी दोन फलाट रेल्वे वाहतुकीसाठी वापरले जातात तर तिसरा रेल लेव्हल फलाट आहे. येथून सैन्याच्या रेल्वेची वाहतूक होते.

२) चौथा फलाट माल गाड्यांसाठी वापरला जातो. टर्मिनल करताना तो प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी बनविला जाईल.

३) खडकी टर्मिनल करताना चारही फलाट प्रवासी रेल्वेसाठी वापरणार.

४) पादचारी पूल, प्रतीक्षालय, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह, मोफत वायफाय, पिण्याच्या पाण्याची सोय करणार.

५) रेल लेव्हल असलेल्या फलाटाची उंची वाढविणार. त्यामुळे त्या फलाटावर मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला जाणार.

प्रवाशांना फायदा काय...

१. पुणे स्थानकावर रेल्वेची संख्या जास्त असल्याने फलाट उपलब्ध न होणे, नव्या गाड्या सुरू न होणे असे प्रकार घडतात. ते बंद होतील.

२. फलाट उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वेला होम सिग्नलवर वाट पाहत थांबावे लागते. यात २० ते २५ मिनिटे वाया जातात. ते आता थांबेल.

३. खडकी स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू होतील.

४. पुणे स्थानकावरून दोन मिनिटांत गाडी सुटेल, त्यामुळे फलाट सहज उपलब्ध होतील.

खडकी स्थानकावर नवे कोचिंग टर्मिनल होणार आहे. त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. पुणे स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खडकी टर्मिनल होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे