पुणे (Pune) : समाविष्ट झालेल्या ३४ पैकी ११ गावांतील नागरिकांना रस्ता रुंदीकरण करण्याबरोबरच पायाभूत सोयीसुविधा देणे महापालिकेला (PMC) शक्य होणार आहे. या गावांतील ताब्यात आलेले सुविधा भूखंड (ॲमेनिटी स्पेस) आणि रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) महापालिकेकडे हस्तांतर केले आहेत. त्यामुळे गावांमध्ये सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात दोन लाख ६५ हजार चौरस मीटरहून अधिक जागा ताब्यात आली आहे.
राज्य सरकारकडून २०१७ आणि २०२० मध्ये महापालिकेच्या हद्दीत टप्प्याटप्प्याने ३४ गावे समाविष्ट झाली. मात्र या गावांमध्ये बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला दिले, तर पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर दिली आहे. या गावांत बांधकाम परवानगी देताना त्यांच्या बदल्यात ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात आलेली ॲमेनिटी स्पेसच्या जागा, तसेच रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
त्यामध्ये फुरसुंगी, मांजरी बुद्रुक, मुंढवा, उंड्री, किरकटवाडी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, औताडे हांडेवाडी, लोहगाव व वाघोली आदी अकरा गावांतील एकूण ३६ रस्ते रुंदीकरणासाठी ताब्यात आलेल्या भूखंडांचा समावेश आहे, तर ३४ भूखंड हे सुविधा क्षेत्रांसाठी महापालिकेच्या ताब्यात दिले आहेत.
त्यासाठी प्राधिकरणाचे जमीन व मालमत्ता विभाग आणि पुणे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभाग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथक तयार केले आहे. पथकाच्या माध्यमातून गावांतील एकूण रस्त्यासाठीचे सुमारे ५४ हजार ९०१ चौरस मीटर क्षेत्र, तर दोन लाख ११ हजार २४ चौरस मीटर सुविधा भूखंड, असे एकूण मिळून दोन लाख ६५ हजार ९२५ चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना महापालिकेला सोयीसुविधांचा विकास करणे सोईचे ठरणार आहे.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील सुविधा भूखंड आणि रस्ता रुंदीकरणासाठीचे क्षेत्र ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात आले आहे. त्या जागा महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे गावांमध्ये सोईसुविधा पुरविणे महापालिकेला शक्य होणार आहे.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी